जळगाव : नवरात्र व विजयादशमीचा सणामुळे सुवर्णनगरी जळगावात दोन आठवड्यांमध्ये सोन्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. दिवसेंदिवस सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र आहे.जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात सणासुदीच्या व लग्नसराईच्या काळात ही मागणी अधिकच वाढते. पितृपक्षापर्यंत सोन्याची मागणी कमीच राहिली. नवरात्र सुरू होताच सोन्याला चांगलीच झळाली येऊ लागली. विजयादशमीला तर शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. या दिवसात भाव कितीही असले तरी ग्राहक सोन्याची खरेदी करतात. त्यात यंदा भाव अधिकच वाढले असतानाही खरेदीही वाढल्याचा दावा आहे. जळगावात आज सोन्याचा भाव ३८,४०० रुपये तर चांदीचा ४६ हजार रुपये भाव होता.गेल्या दोन आठवड्यात सोन्याची ग्राहकी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ज्या ठिकाणी एक किलो सोने विक्री होत असे तेथे आता ते सव्वा किलोच्यावर विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यात आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांचा मोठा उत्साह बाजारात दिसून येत आहे. त्या सोबतच लग्नसराईदेखील जवळ येत असल्याने खरेदीची लगबग असल्याचे सांगितले जात आहे.गुंतवणूक वाढलीसध्या सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले जात आहे. सोने खरेदी म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असल्याचे मानून पूर्वीपासूनच अनेक जण मुहूर्तावर किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करीत असतात. त्यानुसार यंदाही सण-उत्सवाच्या खरेदीसह सुरक्षित गुंतवणूक म्हणूनदेखील सोन्याकडे अधिक कल वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.मागणी वाढण्याची अपेक्षाचार वर्षांच्या तुलनेचा विचार केला तर आताची ही मागणी अद्यापही त्या प्रमाणात नसल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलेला नाही. दिवाळीमध्ये चांगल्या व्यवसायाची प्रत्येक सुवर्ण व्यावसायिकाला अपेक्षा असते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीची प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.नवरात्र उत्सवापासून सोन्याची मागणी चांगली वाढली असून ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यात गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदीकेलीजातआहे.- अजयकुमार ललवाणी,अध्यक्ष,जळगाव शहर सराफ असोसिएशन.चार वर्षांची तुलना पाहिली तर त्या प्रमाणात सोन्याला मागणी नाही. यंदा चांगला पाऊस झाला असून दिवाळीच्या काळात सर्वांना चांगल्या अपेक्षा आहेत.- ईश्वरलाल जैन,सुवर्ण व्यावसायिक
सुवर्णनगरी जळगावात दोन आठवड्यात ३० टक्क्यांनी वाढली सोन्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:00 PM