लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी वाढत असून यामुळे त्यांचे भावदेखील वधारले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चांदीचे भाव ७३ हजारांच्या पुढे गेले आहे. सोनेदेखील ५० हजारांच्या दिशेने जात आहे. सध्या चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रति किलो तर सोने ते ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचे संकट ओढवले त्यावेळी सोने चांदीत अधिक गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी नवी उच्चांकी गाठली होती. त्यानंतर भाव कमी-कमी होत गेले. आता यंदादेखील कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ६ एप्रिलपासून सुवर्ण बाजार बंद असला तरी कमोडिटी बाजारात उलाढाल सुरू होती. यात अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली. गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील गुंतवणूक वाढत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच गेले.
दोन महिन्यात चांदीच्या भावात सात हजारांहून अधिक वाढ
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध लागू झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत चांदीच्या भावात सात हजार ४०० रुपये तर सोन्याच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. या बंद दरम्यान गुढीपाडवा, अक्षयतृतीया हे दोन महत्त्वाचे खरेदीचे मुहूर्त हुकले. मात्र कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून या दोन्ही मुहूर्तावर खरेदीचे प्रमाण वाढलेले होते. ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला त्यावेळी सोने ४६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर अक्षयतृतीयेपर्यंत ते ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. ही वाढ कायम राहत २६ मे पर्यंत सोने ४९.२२० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. मात्र २७ मे रोजी सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली व ते ४८ हजार ६२० रुपयांवर आले. त्यानंतर पुन्हा वाढ होत जाऊन १ जून रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला. त्या दिवशी ४९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर सोने पोहचले. पुन्हा यात वाढ होत जाऊन आता ते ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहे. अशाच प्रकारे ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला. त्यावेळी चांदी ६६ हजार १०० रुपये प्रति किलो होती. अक्षयतृतीयेपर्यंत ती ७१ हजार २०० रुपयांवर पोहोचली. ही वाढ कायम राहत १ जून रोजी निर्बंध शिथिल झाल्यानंतर ७३ हजार रुपये प्रति किलोवर चांदीचे भाव पोहोचले. आता पुन्हा हळूहळू वाढ होत जाऊन ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर ती पोहोचली आहे.
वाढती गुंतवणूक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे पुन्हा गुंतवणूक वाढत असल्याने या दोन्ही धातूंचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोने-चांदी खरेदीचे प्रमाण ६७ टक्के असून २७ टक्के विक्रीचे प्रमाण आहे तर ६ टक्के व्यवहार थांबलेले (होल्डवर) आहे.