लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एरव्ही लग्नसराईनंतर जुलै महिन्यापासून घसरण होणाऱ्या सोने-चांदीच्या भावात गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही वाढ होत आहे. लग्नसराईचा काळ असलेल्या एप्रिल महिन्यात ४६ हजार १०० रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याचे भाव सध्या ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. अशाच प्रकारे चांदीचे भावदेखील ६६ हजारांवरून ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
सोने-चांदीचे भाव दरवर्षी साधारण नवरात्रोत्सवापासून वाढण्यास सुरुवात होऊन लग्नसराई अर्थात मे-जून महिन्यापर्यंत अधिक असतात. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिना हा सराफ बाजारात मंदीचा काळ समजला जातो. मात्र गेल्या वर्षापासून जुलै महिन्यात सोने-चांदीचे भाव वाढत आहे.
गुंतवणूक वाढीचा परिणाम
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आणि सराफ व इतर व्यवसायांवर बंधने आली. सर्वच व्यवसाय मंदावत असताना सोने-चांदीत गुंतवणूक वाढू लागली व या मौल्यवान धातूचे भाव वाढू लागले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोने ४७ हजार रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर जुलै २०२०मध्ये हे भाव ५३ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. अशाच प्रकारे एप्रिल २०२०मध्ये ४२ हजार १०० रुपयांवर असलेली चांदी जुलै २०२०मध्ये ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती.
अक्षयतृतीयेपेक्षा अधिक भाव
गेल्या वर्षी मंदीच्या काळात भाववाढ झाल्यानंतर यंदाही तशीच स्थिती आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात ४६ हजार १०० रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या भावात दोन हजार ९०० रुपयांची वाढ होऊन ते ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. अक्षयतृतीया, १४ मे रोजी सोने ४७ हजार ७०० रुपये होते. या मुहूर्ताच्या काळापेक्षा जुलै महिन्यात सोने वधारले आहे. अशाच प्रकारे एप्रिल महिन्यात ६६ हजार १०० रुपये प्रति किलोवर असलेली चांदी सध्या ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
डॉलर वधारण्यासह खरेदी अधिक
सध्या अमेरिकन डॉलरचे दरदेखील वाढत जाऊन ७४.४३ रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे भाव तर वाढतच आहे, शिवाय कोरोनामुळे सोने-चांदीत गुंतवणुकीकडे कल वाढत असल्याने ही भाववाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
लग्नसराई व मंदीच्या काळातील तुलना
महिना-सोने-चांदी
एप्रिल २०२०-४७,०००-४२,१००
जुलै २०२०-५३,५००-६७,५००
एप्रिल २०२१-४६,१००-६६,१००
जुलै २०२१-४९,०००-७०,०००