जळगाव : शुक्रवारी घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा वाढ झाली असून डॉलरचे दर वधारल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी एक हजार ८०० रुपयांची घसरण झाल्यानंतर शनिवारी एक हजार ३०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजारावर पोहोचली तसेच सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
सध्या लग्नसराई नसल्याने व डॉलरचे दर कमी होण्यासह अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी सोन्यात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ४७ हजार रुपयांच्या खाली होते. त्यानंतर शनिवार, २० फेब्रुवारी रोजी त्यात ४०० रुपयांची वाढ होऊन ते पुन्हा ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी चांदीत एक हजार ८०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र शनिवार, २० फेब्रुवारी त्यात एक हजार ३०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.