जळगाव : सलग दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात शनिवार, ६ मार्च रोजी भाववाढ झाली. यामध्ये सोन्यात ५०० रुपयांची वाढ होऊन ते ४५ हजार ८०० रुपये तर चांदीतही ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६७ हजारांवर पोहोचली.
सट्टाबाजारातील उलाढालीने सुवर्णबाजारात चढ-उतार सुरूच आहे. यात सुवर्णबाजारात मार्च महिन्याची सुरुवात सोने-चांदीच्या भाववाढीने झाली. १ रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपये तर चांदीत एक हजाराने वाढ झाली होती. त्यानंतर २ रोजी सोन्यात थेट ८०० रुपयांची तर चांदीत एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर मात्र ३ मार्च रोजी सोन्यात ३०० रुपयांची तर चांदीत दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती. मात्र ४ व ५ मार्च या दोन दिवसांत मोठी घसरण झाली. यात सोने एक हजार २०० तर चांदीत तीन हजार ५०० रुपयांची घसरण झाली होती.
त्यानंतर मात्र शनिवार, ६ मार्च रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची भाववाढ होऊन ते ४५ हजार ८०० रुपये प्रति तोळा तर चांदीतही ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६७ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली.