वाढती गुंतवणूक : यंदाही सोने-चांदी खरेदीला पसंती
जळगाव : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनदरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंचे दर वाढत आहे. निर्बंधादरम्यान सोन्याच्या भावात दीड हजार रुपये तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सोने-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्र यामुळे बाधित झाले. त्यावेळी देखील सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत गेले. तसेच लॉकडाऊन जाहीर झाल्याने सुवर्ण पेढ्या बंद राहिल्या व मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरूच राहिल्याने त्यामध्ये सोने चांदीचे भाव चांगलेच वाढत गेले.आता यंदादेखील कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व पुन्हा एकदा सुवर्ण पेढ्या बंद झाल्या. असे असले तरी मल्टी कमोडिटी बाजारात सोने-चांदीची खरेदी विक्री सुरूच आहे.
सोन्यात दीड हजारांची वाढकोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधावेळी ५ एप्रिल ला सुवर्ण पेढ्या बंद झाल्या त्यावेळी सोने ४६ हजार रुपये प्रति तळ्यावर होते. त्यानंतर आता त्यात वाढ होत जाऊन सध्या ते ४७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अशाच प्रकारे ६८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात वाढ होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.