जळगाव : रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात सुवर्ण तारण योजनेची व्याप्ती वाढवून आता थेट ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची घोषणा केल्याने सोन्याचे महत्त्व अधिक वाढून त्यातून मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे सोन्याची आणखी मागणी वाढून या धोरणामुळे सोन्याची चकाकी अधिकच वाढण्याचा सूर उमटत आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केले. यामध्ये मासिक हप्त्याबाबत अपेक्षित घोषणा झाली नसली तरी सोन्याच्या बाबतीत मोठी घोषणा केल्याने सुवर्णनगरी जळगावातून या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या संकटात अधिक परतावा मिळणार असल्याने त्याचा लाभ सर्वांनाच होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसे पाहता गेल्या काही महिन्यांपासून सोने तारण योजनेकडे अधिक कल वाढला असून, बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरही कमी केले आहे. यामध्ये तारण ठेवलेल्या सोन्यावर त्याच्या मूल्याच्या ७५ टक्के कर्ज मिळते. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवून थेट ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे ओढावलेल्या बिकट आर्थिक स्थितीत गरजवंतांच्या हाती अधिक पैसा उपलब्ध होऊन गरजा पूर्ण होणार असल्याने या स्थितीतून ही तारण योजनाच खºया अर्थाने सर्वांना तारणार असल्याच्या प्रतिक्रि या उमटत आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला झळ बसत असताना सोने-चांदीत मात्र मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सध्या सोन्याकडे पाहिले जात आहे.या धोरणाचे स्वागत असून, यामुळे अधिक परतावा मिळणार आहे. सोबतच बँकांकडे ओघ वाढून सोने न मोडता सुरक्षितही राहू शकेल. यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढू शकते.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन