ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18 - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. विजयादशमीपासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून आज ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली होती. दरम्यान, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होऊन संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. मात्र गेल्या दीड वर्षापासून विविध कारणांनी सोने खरेदीत मंदीचे वातावरण होते. त्यानंतर विजयादशमीला शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या होत्या. हा उत्साह अद्यापही कायम आहे. त्यात धनत्रयोदशीला सोने खरेदीला मोठे महत्त्व असल्याने या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजेपासून सुवर्णपेढींमध्ये मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली, ती रात्रीर्पयत कायम होती. शहरात आज सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. शहरातील 150च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. कपडे, फटाके खरेदीचीही लगबगबाजारपेठेत कपडे खरेदीसाठीदेखील ग्राहकांनी गर्दी केली होती. यामध्ये रेडीमेड कपडय़ांना अधिक मागणी होती. दिवाळीचा आंनद साजरा करण्यासाठी फोडण्यात येणा:या फटाक्यांच्या दुकानांवरही गर्दी होती.350 दुचाकींची विक्रीसोने खरेदीसह दुचाकीचा बाजारदेखील बहरला. यामध्ये एकाच दालनामध्ये 250 दुचाकींची विक्री झाली. इतर दालने मिळून 350 वाहनांची विक्री झाली. या सोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडी, फ्रिज, वाशिंग मशिन यांना मोठय़ा प्रमाणात मागणी राहिली. मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होती. यामध्ये 200 मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचाही ग्राहकांकडून फायदा घेतला जात आहे. -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स
दुचाकीच्या खरेदीस मोठा प्रतिसाद मिळत असून आज 250 दुचाकींची विक्री झाली. दोन दिवसात यामध्ये अजून वाढ होणार आहे. -अमित तिवारी, महाव्यवस्थापक, राम होंडा.