यावल येथे भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून लुटलेले ११ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोने लुटल्याची फिर्याद मालक जगदीश रत्नाकर कवडीवाले यांनी पोलिसांत दिली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुकेश प्रकाश भालेराव (रा. भुसावळ) याला फैजपूरनजीकच्या भोरटके जंगलातून ताब्यात घेतल्याचा दावा करून त्याच्याकडून काही सोने जप्त केले असून, ते बेंटेक्सचे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगितले आहे. दुकानमालक जगदीश कवडीवाले यांनी मात्र लुटलेले सोने खरेच आहे, त्यात बेंटेक्सचेपण होते. ते अगदी कमी आहे. खरे सोनेच जास्त गेले आहे, असे ‘लोकमत’ला सांगितले. यावर ज्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हे सोने बेंटेक्सचे आहे, असे सांगितले ते त्यावर आजही ठाम आहेत, तर खरे सोने अजून जप्त व्हायचे बाकी आहे.
सोन्याने वाढविला गुंता
गुन्हा घडला हे निर्विवाद सत्य आहे, त्यात सोन्याचे दागिने व बेंटेक्सचे दागिने अशा दोन्ही प्रकारचे दागिने होते असे दुकानमालक सांगतात. बेंटेक्सचे सोने एक लाखाचेही नसेल. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखा जप्त दागिने बेंटेक्सचे सांगत असताना खरे सोने फरार आरोपीकडे असल्याचे सांगत आहेत, तर यावल पोलीस मात्र तपास सुरू आहे, असे सांगून या विषयावर बोलणं टाळत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे.
कोट...
माझ्या दुकानातून लुटलेले सोने नकली नाही. खरेच सोने लुटले आहे. बेंटेक्सचे दागिने त्यात होते, मात्र ते अगदीच किरकोळ आहेत. फिर्यादीत दिल्याप्रमाणे माझे खरे सोने गेलेले आहे.
- जगदीश कवडीवाले, सराफ व्यावसायिक
कोट...
संशयित आरोपीकडून हस्तगत झालेले दागिने सोन्याचे नाहीत. बेंटेक्स व सोन्याची पॉलिस असलेले आहेत. नोटाही फाटक्या आहेत. अटकेतील चारही जणांकडून तपासात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. फरार असलेल्या संशयिताला अटक झाल्यावर बऱ्याच बाबींचा उलगडा होईल.
-सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक, यावल
कोट...
या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झालेली आहे. एक जण फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. अटकेतील संशयिताकडे मिळालेले दागिने बेंटेक्सचेच आहेत. खरे दागिने किती व कुठे आहेत याचा तपास केला जात आहे. तपास अजून अपूर्ण असल्याने या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झालेला नाही.
- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक