चोपडा, दि.4- पुणे येथील रेसिडेन्सी क्लब या आर्ट गॅलरी मध्ये 29 एप्रिल रोजी देशभरातील 25 कलाकारांनी आपल्या 125 चित्रांचे प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनात चोपडा तालुक्यातील कलाशिक्षकांनी सहभाग नोंदविला. प्रदर्शनात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांचे चोपडय़ाच्या कलाशिक्षकांनी काढलेल्या चित्रांनी लक्षवेधून घेतले.
पुणे येथे 29 एप्रिल रोजी देशभरातील 25 कला शिक्षकांनी आपल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविले. क्रीडा आणि कलेचा संगम घडवून यावा असा या प्रदर्शनाचा हेतू होता. या प्रदर्शनात घोडगाव ता चोपडा येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक वसंत नागपुरे (बारी) आणि चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील कला शिक्षक पंकज नागपुरे (बारी) यांचे प्रत्येक पाच चित्र लावण्यात आले होते. या पूर्वी मुंबई ,पुणे आणि नागपूर येथे भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात देखील नागपुरे बंधूंनी वेगवेगळ्या विषयावर काढलेली चित्र सादर केली आहे. पुणे येथील चित्र प्रदर्शनात नागपुरे बंधूंची सर्व चित्रे लक्षवेधी ठरली. या चित्र प्रदर्शन उद्घाटन ऑस्ट्रेलियातील वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्या हस्ते झाले. दोन्ही कलाशिक्षकांनी स्वत: काढलेली कॅलिओग्राफी चे चित्रे बेट्र ली यांना भेट दिली. या चित्रांची प्रेमळ भेट बेट्र ली यांनी स्विकारत दोन्ही शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी आर्ट अॅण्ड क्रॉफ्ट गॅलरीच्या सहसंस्थापक अक्षया बोरकर, प्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.