- भूषण श्रीखंडे
जळगाव : भारतीय रेल्वेने भुसावळ विभागातील जळगाव स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जळगाव स्टेशनचा पुनर्विकास होणार असून जळगावकर प्रवाशांना अधिक चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा यामुळे मिळणार आहेत.
दोन महिन्यांत या योजनेअंतर्गत रेल्वेस्थानकावर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवित आहे. याअंतर्गत देशभरातील स्थानकांचा कायापालट होत आहे.
भारतीय रेल्वे विभागाने शनिवारी, दि. ९ रोजी जळगाव रेल्वेस्थानकाचा या योजनेत समावेश केला आहे. यामुळे जळगाव रेल्वेस्थानकाचे रूप पालटणार असून, स्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह, तिकीटघराची नवीन इमारत आदी सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत.