अंदाजपत्रकातील महत्वाचे मुद्दे
-कोणतीही करवाढ नाही
मनपाचे करवाढ नसलेले ११६९ कोटींचे अंदाजपत्रक सादर
- मनपातील विविध शुल्क आकारणीत वाढ
-मलनिस्सारण योजना कार्यान्वित झाल्यानंतर मलप्रवाह कर लागू होणार
- वृक्षांच्या संगोपणासाठी २ कोटींची तरतुद, वृक्षांसाठीचा स्वतंत्र बजेट
- किरकोळ वसुली, व्यापारी संकुल वसुली विभागासह इतर वसुलीचे विभाग बंद होणार
- मालमत्ता व्यवस्थापन विभागातंर्गत होणार गाळ्यांची वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचे ११६९ कोटी ७० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेपुढे सादर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला असून, यंदा कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. १० कोटी ४३ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. तसेच शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या रस्त्यांचा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी १०४ कोटींची तरतुद या करण्यात आली आहे.
स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक सादर केले. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड, उपायुक्त शाम गोसावी, मुख्य लेखा अधिकारी कपिल पवार, उपायुक्त संतोष वाहुळे नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.
हवेतील आकडे न सांगता, कृतीवर दिला भर
महापालिकेचे अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक २९८ कोटी ४४ लाख इतकी आहे. त्यात महापालिकेचे महसुली उत्पन्न ३६३ कोटी ५४ लाख रुपये, भांडवली उत्पन्न ३९९ कोटी ५४ लाख, असाधारण देवघेव ५६ कोटी ८ लाख, पाणीपुरवठा ४५ कोटी ५२ लाख तर मलनिस्सारण योजनेचे उत्पन्न ६ कोटी ७५ लाख दर्शविण्यात आले आहे. असे एकत्रित अंदाजपत्रक ११६९ कोटी ७० लाख रुपयांचे प्रस्तावित केले आहे.
मलप्रवाह कर लागू होणार ; शुल्क आकारणीत वाढ
अंदाजपत्रकात मलनिस्सारण योजना पूर्ण झाल्यानतंर मलप्रवाह कर नव्याने लागू करण्याचे संकेत दिले आहे. तसेच महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखले व उतारे तसेच हस्तांतरणाच्या सेवा देतांना आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात देखील वाढ सुचविली आहे.
१. मालमत्ताकराच्या वसुलीत वाढ अपेक्षित
२०२०-२१ या वर्षात मनपाच्या मालमत्ताकराची वसुलीचे उत्पन्न ५० कोटी इतके अपेक्षित होते. सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून, शहरातील मालमत्तांचे वार्षिक भाडे मुल्या निर्धारित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदापासून मालमत्ताकरापासून मिळणारे उत्पन्न ७५ कोटी इतके निश्चित केले आहे.
२. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून बसविण्यात येतील वॉटर मीटर
अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी आवश्यक असलेले वॉटरमीटरसाठी लागणारा खर्च सार्वजनिक खासगी भागीदारीतून तयार करण्यात येणार आहे.
३. खुला भूखंड कर वसुली विभाग बंद होणार
खुल्या भूखंडावरील कर वसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडून खुल्या भूखंडधारकांचा शोध घेवून त्यांच्याकडून कराची वसुली केली जाते. काही वर्षांपासून ही वसुली व्यवस्थित होत नसल्याने आता हा विभाग बंद करून मालमत्ताकर विभागाकडेच हे वसुलीचे काम दिले आहे.
४. मालमत्ता व्यवस्थापन विभाग होणार सुरु
मुदत संपलेले मार्केटमधील गाळेधारकांकडील असलेली थकबाकी, इतर मार्केटमधील थकबाकी, हॉकर्सकडून होणारे वसुली यासाठी मनपात स्वतंत्र विभाग आहेत. मात्र, मालमत्ताकराची वसुली वगळता इतर कर व भाड्यांची वसुलीसाठी मनपात १ एप्रिलपासून मालमत्ता व्यवस्थापन विभाग सुरु केला जाणार असून या विभागाची जबाबदारी मनपा उपायुक्तांवर सोपविण्यात येणार आहे.
५.वृक्षांच्या संगोपणासाठी २ कोटी २६ लाख
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणाऱ्या बाबींवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शहरात वृक्ष लागवड केल्यानंतर या वृक्षांच्या संगोपणासाठी मनपाकडून स्वतंत्र बजेट केले असून, एकूण २ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
सभा तहकुब
प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सभा तहकूब केली. पुढील तहकूब सभेत स्थायी सभापतींकडून या अंदाजपत्रकात सुधारणा करुन त्यानतंर सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.
असा येईल रुपया (उत्पन्नाची जमा बाजू )
आरंभीची शिल्लक- २९८ कोटी ४४ लाख
महसुली जमा- ३६३ कोटी ५४ लाख रुपये
भांडवली जमा-३९९ कोटी ३६ लाख रुपये
असाधारण देवघेव-५६ कोटी ८ लाख रुपये
पाणीपुरवठा- ४५ कोटी ५२ लाख रुपये
मलनिस्सारण- ६ कोटी ७५ लाख रुपये
एकूण जमा-११६९ कोटी ७० लाख रुपये
असा जाईल रुपया (खर्चाची बाजू )
अखेरची शिल्लक- १० कोटी ४३ लाख रुपये
महसुली खर्च- ४२३ कोटी ५५ लाख रुपये
भांडवली खर्च ६०६ कोटी ८८ लाख रुपये
असाधारण देवघेव- ७६ कोटी ३२ लाख रुपये
परिवहन- ३७ हजार
पाणीपुरवठा- ४५ कोटी ७४ लाख रुपये
एकूण खर्च- ११६९ कोटी ७० लाख रुपये