लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा संपली... पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ लस ही जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी ६ वाजता दाखल झाली. पहिल्या टप्प्यासाठी २४ हजार ३२० लसींचा पुरवठा करण्यात आला असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचा-यांना लसीकरण होईल. लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून नऊ केंद्रांवर सुरुवात होणार आहे.
कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोविशिल्ड व को-व्हॅक्सिन लसींची निर्मिती देशात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात होणार आहे. सुरुवातीस नऊ केंद्रांवर लस देण्यात येईल. गेल्या ८ जानेवारीस कोविड लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही झाली होती. त्यात १०० जणांवर जिल्ह्यात चार ठिकाणी रंगीत तालीम झाली होती. १६ तारखेपासून प्रत्यक्षात लसीकरणास सुरुवात होणार आहेत. त्याबाबत मंगळवारी नऊ केंद्रांवरील लसीकरणासाठी नेमलेल्या कर्मचा-यांना जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले. बुधवारी जिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागातर्फे व्ही.सी. झाली. त्यात जळगावमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद सहभागी झाले होते.
आधी केली जिल्हाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी
जळगाव जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी २४ हजार ३२० डोसचा पुरवठा होणार होता. ही लस कोठे ठेवावी, हा प्रश्न होता. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ६ वाजता जागेची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, आरएमओ डॉ. विजय जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नेत्रकक्ष, अधिष्ठाता कार्यालय परिसर, एआरटी सेंटर, रुग्णालय परिसर, अपघात, ओपीडी विभाग पाहून चर्चा केली. शेवटी रुग्णालय आवारातील जिल्हा परिषदेच्या औषध भांडार विभागात लसीचा साठा ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.
लस घेऊन आली नाशिक विभागाची विशेष व्हॅन
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कोरोना लसीचे (कोविशिल्ड) चे २४ हजार ३२० डोस घेऊन नाशिक विभागाची लस वितरणासाठीची खास व्हॅन जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया तेथील कर्मचा-यांनी दिली. दरम्यान, ही इन्सुलेटेड व्हॅन नाशिकहून धुळ्याला आधी लसीचे डोस उतरवून नंतर जळगावात दाखल झाली होती. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. तसेच औषधशास्त्र निर्माण विभाग अधिकारी सुरेश मराठे यांनी तपासणी करून ही लस ताब्यात घेतली असून ती लस जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जिल्हा परिषदेच्या औषध भांडार विभागात ठेवण्यात आली आहे.
चौदा हजार कर्मचा-यांना आधी लसीकरण
जळगाव जिल्ह्यातील अगोदर आरोग्य क्षेत्रातील १४ हजार कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार आहेत. नंतर पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. एक लस ही ५ एमएलची असेल. त्यातून प्रत्येकी केवळ ०.५ एमएलचा डोस द्यायचा आहे. त्यानुसार एका कुपीतून १० जणांना डोस देता येईल, अशी कोविशिल्डची रचना आहे. एका बॉक्समध्ये तीन हजार बॉटल्स आहेत.
अशी आहेत केंद्रे
१६ जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयांंत, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांत तर जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय (पंचमुखी हनुमान मंदिरामागे), भिकमचंद जैन रुग्णालय (शिवाजीनगर, जळगाव) अशा एकूण नऊ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले आहे.
२ ते ८ अंश तापमानात साठवणूक
कोविशिल्ड या लसीची औषध भांडार विभागात २ ते ८ अंश तापमानात साठवणूक करण्यात आली आहे. या विभागात तापमान मशीनही बसविण्यात आले आहे. त्यामुळे अधिका-यांना तापमान ऑनलाइनसुद्धा पाहता येईल, अशी माहिती औषधशास्त्र निर्माण विभाग अधिकारी सुरेश मराठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुरुवारी होणार वितरण
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ९ केंद्रांना ही लस वितरित केली जाणार आहे. त्यानंतर १६ जानेवारीपासून सकाळी ९ वाजता लसीकरणाला सुरुवात होईल. स्
पॉइंटर
जळगाव जिल्ह्यातील लसीकरण केंद्र - ०९
लसींचा झालेला पुरवठा - २४ हजार ३२०
आधी किती कर्मचा-यांना होणार लसीकरण - १४ हजार.