जळगाव - रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे (नो हॉर्न) याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी उप प्रादेशिक परिवाहन कार्यालातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महावॅाकेथॉन रॅलीला जळगावकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या महावॉकेथॉन रॅलीला महापौर सिमाताई भोळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रस्ता सुरक्षिततेच्यादृष्टिने जनजागृती होण्यासाठी आज राज्यात हे विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत संपूर्ण राज्यात आज एकाच दिवशी- एकाच वेळी २०० विविध ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राज्यात लाखो नागरीकांनी सहभाग घेतला. जळगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रोटरी क्लब ऑफ गोल्ड सिटी, शहर वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2 कि.मी. महावॅाकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या महावॉकेथॉन रॅलीत मान्यवरांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, निमशासकीय विभागांचे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या महावॉकेथॉनचा रॅलीचा शुभारंभ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे करण्यात आला. त्यानंतर रॅली मायादेवी मंदीर-काव्यरत्नावली चौक-आकाशवाणी चौक या मार्गाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. महावॉकेथॉन रॅली यशस्वी करण्यासाठी परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.