जळगाव शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका नाशिक येथील वॉटरग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, सुरूवातीपासूनच शहरातील अनियमित साफसफाई बाबत नागरिकांमधुन तक्रारी करण्यात येत आहे. जळगाव मनपासह धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. धुळ्यातही वॉटरग्रेसला दोन वर्षांपूर्वी ठेका देण्यात आला होता. ठेका देतेवेळी विविध अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. मात्र, वॉटरग्रेसकडून अटी-शर्तीचा भंग होत असल्याने नोटीस देण्यासह १० ते १५ लाखापर्यंत दंडही ठोठावण्यात आला होता. तसेच घंटागाडीचे वजन वाढविण्यासाठी माती टाकण्याचा प्रकार, कचरा संकलनात अनियमितता, घंटागाडीच्या नियोजनाचा अभावी आदी तक्रारी वाढल्याने, धुळे महापालिकेने ७ जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटरग्रेसच्या जागी रिलायबल या कंपनीला कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
इन्फो :
जळगावात सत्ताधारींकडून अभय का
जळगावात वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासूनच भाजपात काही नगरसेवकांनी विरोध केला होता. यामुळे भाजपा नगरसेवकांमध्येच दोन गट पडले होते. यावर आमदार गिरीश महाजनांनी मध्यस्थी करुन नगरसेवकांचे मनोमिलन घडवुन आणले असले तरी, काही नगरसेवकांचा या ठेक्याला विरोधचं आहे. तसेच सध्या स्थितीलाही शहरातील स्वच्छतेची समस्या कायम आहे. मात्र जळगावात भाजपकडून वॉररग्रेसचा ठेका रद्द न करता, अभय का. ? ? ? ? ? ?.असा प्रश्न भाजपातील काही नगरसेवकांकडूनचं उपस्थित केला जात आहे.
इन्फो :
तर दोन्ही ठिकाणी गिरीश महाजनांचेच नेतृत्व
जळगावसह धुळे महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. आमदार गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कामकाज सुरू आहे. सत्ता मिळविण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेवर भर देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाजनांच्या नेतृत्वाखाली जळगाव व धुळे या दोन्ही ठिकाणी वॉटरग्रेसला मक्ता देण्यात आला आहे. मात्र, कामात सुधारणा होत नसल्यामुळे, धुळ्यातून वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जळगावतातही असाच प्रकार सुरू असतांना, या वॉटरग्रेसचा ठेका अद्याप का रद्द झाला नाही, वॉटरग्रेसला अभय का ? असा प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.