ऑनलाईन लोकमत/अनिल मकर
धुळे, दि.6- स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाच्या पाऊलखुणा आजही धुळ्यात पहावयाला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून 1935 मध्ये स्थापन झालेली शहरातील मालेगाव रोडवरील गांधी तत्त्वज्ञान केंद्रजवळील गौशाला होय. खान्देश गोसेवाश्रमांतर्गत चालविल्या जाणा:या गोशाळेत आजही 200 ते 225 जनावरांचा सांभाळ केला जात आहे.
1935 मध्ये स्थापना
भारतीय संस्कृतीत गीता आणि गंगे पाठोपाठ गाईला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच या देशातील ऋषि, मुनीपासून ते आधुनिक भारताचे निर्माते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महान दार्शनिक आचार्य विनोबा भावे नेहमी गाईंचे रक्षण व संगोपनावर भर देत असत. त्यांच्याच प्रेरणेने धुळे येथे 1935 मध्ये खान्देश गोसेवाश्रमाची स्थापना करण्यात आली. ही गोशाळा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या गोसेवेचे साकार स्वप्न आहे.
साबरमती आश्रमातून गांधींजीनी पाठविल्या 14 गाई
धुळे शहरातील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक स्व.रामेश्वरजी पोद्दार यांनी पूज्य विनोबा भावे, त्यांचे बंधू पूज्य शिवाजीराव भावे यांच्याबरोबर महात्मा गांधी यांच्यासमोर गौशाळेची कल्पना मांडली होती. महात्मा गांधींनी त्याला तात्काळ संमती दिली. त्यातूनच 1935 मध्ये गौशाळेची स्थापना करण्यात आली. स्वत: गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातून गीर जातीच्या 14 गाई या गोशाळेला पाठविल्या होत्या.
धुळेकरांचे योगदान
स्वतंत्र्य सेनानी स्व.रामेश्वरजी पोद्दार आणि धुळ्याचे प्रथम खासदार स्वातंत्र्य सेनानी स्व. शालीग्राम भारतीया यांनी 8 गायी आणि 14 एकर 10 गुंठे जमीन गोशाळेला दिली. पूज्य विनोबा भावे आणि शिवाजीराव भावे यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेचे काम सुरू झाले. गोपालनच्या कार्यात त्यांचे सहकारी जळगाव जिल्ह्याचे शेतकरी भोजू पोपट पाटील, सुरजमल मामाजी, हरिभाऊ तळेले यांचे सहकार्य मिळू लागले. भोजू पाटील यांच्या मृत्यूनंतर गोशाळेच्या देखदेखीसाठी वर्धा आश्रमातून विनोबा भावे यांनी बालमुकुंदजी पोद्दार यांना गौशाळेच्या सेवेसाठी पाठविले.
महान व्यक्तींचा पदस्पर्श
धुळे येथील या गौशाळेला अनेक महान व्यक्तींचा पदस्पर्श झाला आहे. महात्मा गांधी, डॉ.राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जमनालाल बजाज, कमलनयनजी बजाज, रामकृष्णजी बजाज, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, महान साहित्यिक काकासाहेब कालेलकर, संतश्रेष्ठ श्री.गाडगे महाराज, यशवंतराव चव्हाण या व्यक्तींनी या गौशाळेला भेट दिली आहे.
याप्रकारे या ऐतिहासिक वारसा जतन आणि प्रगत करण्यासाठी मोहनलाल भारतीया, राधेश्याम पोद्दार यांच्या नेतृत्त्वाखाली संस्थेची कार्यकारिणी आणि सभासद प्रयत्नशील आहेत. यासाठी या गौशाळेसाठी समाजातील विविध घटकांचा मोठय़ा प्रमाणात सहकार्य मिळत आहे.
दररोज 70-80 लीटर दूध
या गोशाळेत 25 दुभती जनावरे आहेत. तर बाकीचे बैल व भाकड जनावरे आहेत. त्यांच्या व्यवस्थित सांभाळ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. या दुभत्या जनावरांपासून दररोज 70 ते 80 लीटर दूध मिळते. त्यांची विक्री करून सर्व जनावरांचा सांभाळ केला जातो. गोशाळेच्या जागेवर चारा पिकविला जातो. तर काही वेळेस त्यांना चारा विकत घ्यावा लागतो. या गोशाळेसाठी थोडय़ाफार प्रमाणात सामाजिक संस्थांचीही मदत मिळते.
रामेश्वर पोद्दार यांची तिसरी पिढी कार्यरत
रामेश्वर पोद्दार यांची तिसरी पिढी म्हणजे त्यांचे नातू राधेश्याम पोद्दार आजही नि:स्वार्थ भावनेने या गोशाळेची सेवा करत आहेत.