नशिराबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले असून वाढत्या थंडीसोबत राजकीय गप्पांचे फड सध्या रंगत आहे. चौका-चौकात निवडणुकीची चर्चा असून, शेकोटीभोवती गप्पांना अधिकच उधाण आले आहे.
आपल्या वॉर्डामध्ये सदस्यांनी पाच वर्ष काय काम केले, नागरिकांना अडचणींच्या वेळी किती मदत केली तसेच स्वच्छता, पाणी आणि पथदिवे यांचे प्रश्न किती सोडवले त्याचा लेखाजोखा मांडत आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेची आणि चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी पॅनलची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वाॅर्डात उमेदवार उभे करण्याबाबत गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यात भाऊबंदकी, नातलग, जवळचा कोण, निवडून आल्यानंतर आपल्या बाजूने कोणी राहील का, कोणाला कोणत्या वाॅर्डात उभे करायचे, आपली पार्टी निवडून आली तर सरपंचपद किती वर्ष आपल्याकडे ठेवायचे, याची चाचपणी केली जात आहे. नशिराबादला एकूण सहा वाॅर्ड असून, सदस्य संख्या १७ आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य पुन्हा सत्तेच्या आखाड्यात उतरत असल्याने निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची होणार आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.