जळगाव : स्पर्धा परीक्षेच्या निकालामध्ये तीन गुण कमी मिळून अनुत्तीर्ण झालेल्या आकाश भिमराव बारी (२८, रा.शिरसोली, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १७ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
आकाश बारी हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून राज्यसेवा स्पर्धा (एमपीएससी) परीक्षेची तयारी करीत होता. त्यासाठी त्याने दिलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात आकाश केवळ तीन गुणांनी अनुतीर्ण झाला. त्यामुळे तो नैराश्यात होता. शुक्रवारी दुपारी आजारी आई घराच्या पुढच्या खोलीत व मोठा भाऊ कंपनीत कामाला गेलेला असताना नैराश्यातच आकाशने राहत्या घरात मागच्या खोलीत गळफास घेतला.
संध्याकाळी मोठा भाऊ कंपनीतून आला त्या वेळी त्याला आकाशने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने शेजारील मंडळी व पोलिस पाटील श्रीकृष्ण पाटील यांच्या मदतीने आकाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
भावाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्नआकाशच्या मोठ्या भावाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. त्याची भावजयी माहेरी गेलेली होती व भाऊ कंपनीत असताना या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला.