लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १९ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. ओडिसी नृत्याचे मुळ असलेल्या गोटीपुवा या नृत्याने रसिक दंग झाले तर सुश्री मोहंती यांनी सादर केलेल्या ओडिसी नृत्याने रसिक दंग झाले होते.
छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात १ ते ३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव पार पडला. यात अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात सुश्री मोहंती यांच्या ओडिशातील गोटीपुवा या नृत्याने करण्यात आली. गोटीपुवा हे नृत्य पुर्वी जगन्नाथ मंदिरातच सादर केले जात असे. सुश्री यांनी सुर्याष्टकम सादर करून आपल्या कलाविष्काराला साथ दिली. यावेळी पुरूष कलाकारांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर त्यांनी कृष्ण व यशोदा यांच्यातील ब्रम्हांड दर्शन, पुतना मावशी हे प्रसंग आपल्या नृत्यातून प्रेक्षकांसमोर उभे केले.
त्यानंतर रघुराजपूर,ओडिशा येथील कलाकारांनी गोटीपुवा नृत्य सादर केले. त्यात विनायक कुमार राव, अमन राऊत राव, विनायक जेता, मिटु दास, प्रकाश साहो, ज्योतीरंजन दास, सुर्यकांत सुबुधी यांनी नृत्य सादर केले. त्यांनी द्रौपदी वस्त्रहरण, हिरण्यकक्ष्यप - नरसिंह असे प्रसंग आपल्या नृत्यातून सजीव केले. त्यांना बट कृष्णदास, प्रियापलई दास, कविराज प्रधान, भास्कर पलिदा, राजेश कुमार यांनी साथसंगत दिली.
अभ्यंकर, खानोरे यांच्या आठवणींना उजाळा
स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प्रा. पी.जी. अभ्यंकर आणि सांरगी वादक बाबा खानोरे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. त्यात प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी दोघांच्या योगदानाबद्दल आठवणी सांगितल्या.
पुढील महोत्सव ७ ते ९ जानेवारी २०२२ ला
चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा बालगंधर्व महोत्सव आता पुढील वर्षी ७ ते ९ जानेवारीदरम्यान आयोजित केला जाणार असल्याची घोषणा आयोजकांतर्फे करण्यात आली.