लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील ११७ एकर जागेवर शासनाने चोपडा औद्योगिक विकास केंद्राला मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती चोपड्याच्या आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील सरकारी व खासगी जागेची माहिती देत ते अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करावे, या मागणीसाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यावर राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अंतर्गत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सुचविलेल्या एकूण ६५ हेक्टर २२ आर नियोजित क्षेत्रापैकी २७ हेक्टर २३ आर हे अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक येथील येथील बैठकीत आमदार लता सोनवणे यांनी चहार्डी येथे औद्योगिक विकास केंद्राची अधिसूचना तत्काळ काढण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर २०२० ला राज्य शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार ' अंतर्गत अधिसूचना जारी करीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सुचविलेल्या नियोजित क्षेत्रापैकी २७ हेक्टर २३ आर हे अनुसूचित क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले. यासाठी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही आभार आमदार लता सोनवणे यांनी मानले. दरम्यान, भोकर व खेडीभोकरी दरम्यान तापीनदीवरील पुलाला देखील गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाल्याने गिरणा व तापी परिसर आता एकमेकांना जुळणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
उद्योग आल्यास चोपड्यातील युवकांनी रोजगाराच्या संधी
चोपडा तालुक्यात आदिवासी बांधवांची मोठी संख्या आहे. चोपड्याला निसर्ग संपदा मिळाली असली तरी रोजगाराच्या संधी नसल्याने अनेक युवकांना पुणे, मुंबई किंवा जळगावला जावे लागत होते. आता एमआयडीसी मंजूर झाल्यामुळे भविष्यात उद्योग आल्यास युवकांना रोजगार मिळतील, अशी आशा प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केली. राज्यातील ठिकठिकाणच्या उद्योजकांनी चोपड्यातील औद्योगिक विकास केंद्रात आपले उद्योग उभारावेत यासाठी उद्योजकांना आवाहन केले जाणार असल्याचेही प्रा.सोनवणे यांनी सांगितले.