जळगाव : महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात परत पाठविण्यास राज्य सरकार अंसवेदनशील ठरल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व त्यांचे मंत्री हे घरात बसूनच निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.कोरोनावर मात करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केद्र सुरू करण्याची मागणीही महाजन यांनी केली.यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यात कोरोनाचा कहर वाढला असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ घरात बसून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त शपथ विधीसाठी सहकुटुंब बाहेर पडत आहेत. तर इतर मंत्री फक्त घरात बसून सर्व बाईट देत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.कोरोनाला हरविण्यासाठी डॉक्टर्स, नर्स व पोलीस कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. असे असताना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारमधील कुणीही मंत्री समोर येत नाही. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पॅकेज दिले असतानाही, त्याच्याशी समन्वय ठेवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुढे काय होईल, ही भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. राज्य सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत. रुग्णांसाठी जागा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असे ते म्हणाले.खडसे यांना डावलल्याचा मुद्दा आता जुना-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परिषद निवडणुकीत पक्षाने डावलल्याचा विषय आता जुना झाला आहे, त्यावर भाष्य नको, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.-महाजन यांनी यावेळी परिवहन आयुक्तांशी मोबाईल वरुन संपर्क साधून परप्रांतियांचे ट्रक जळगावात न अडविण्याची मागणी केली.