विजयकुमार सैतवाल
स्टार ९२८
जळगाव : विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत भावी पिढी घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर दिवसेंदिवस अशैक्षणिक कामांचा भार वाढत आहे. शिक्षक मंडळीही त्याला नकार न देता कामांचा स्वीकार करतात. मात्र, हा भार दिवसेंदिवस वाढत असल्याने शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावरदेखील परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.
शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना किती अशैक्षणिक कामे करावी लागतात, याचा आढावा घेतला असता पूर्वी जनगन, निवडणूक कामे, खिचडी शिजविणे या सोबतच आता कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विविध कामे शिक्षकांवर सोपविली गेल्याचे शिक्षकांतर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा - १८२८
एकूण शिक्षक - ७३८९
शिक्षकांची कामे
- कोरोनामुळे शाळा भरणे बंद असल्याने खिचडी शिजविली जात नसली तरी धान्याचे वाटप करावे लागते.
- निवडणुकीची कामे, जनगणना
- माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण
- पल्स पोलिओ लसीकरण
- रेशन दुकानावर नियुक्ती
- कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती
- चेक पोस्टवर तपासणी
एक शिक्षकी शाळेचे हाल
ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, तेथे तर शिक्षकांचे चांगलेच हाल होतात. प्रत्यक्षात शासन निर्णयानुसार एक शिक्षकी शाळा नाहीत. मात्र, ज्या ठिकाणाहून कोणाची बदली झाली असेल, तेथे दुसरा शिक्षक येईपर्यंत प्रतीक्षा असते. त्यामुळे एकाच शिक्षकाला काम करावे लागते. त्यात अशैक्षणिक कामे वाढल्यास अधिकच हाल होतात.
शिक्षण सोडून इतर कामांसाठी किमान एक शिक्षक
१) शैक्षणिक कामांव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे वाढत असल्याने बहुतांश शाळांमध्ये अशा कामांसाठी किमान एक शिक्षक अडकून जात असल्याचे सांगितले जात आहे.
२) जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य विभाग असतानाही शिक्षकांना या कामांना लावले गेल्याचे सांगण्यात आले.
३) शालेय पोषण आहार शिजवून नोंदी ठेवणे, बांधकामाच्या कामांवर लक्ष ठेवून रेकॉर्ड ठेवणे अशी कामे करण्यात शिक्षक अडकतात.
कोरोना काळात कहरच केल्याचा दावा
शासनाने शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. निवडणुकीची कामे, जनगणना, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण, पल्स पोलिओ लसीकरण, याशिवाय कोविड काळात या कामांनी कहरच केला. शिक्षकांना रेशन दुकानावर नियुक्ती, कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्ती, चेक पोस्टवर नियुक्ती यासारखी कामे करावी लागली. त्यामुळे अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.
कित्येक वर्षांपासून शिक्षक अनेक अशैक्षणिक कामे करीत आहेत. त्यामुळे शिकवण्याचा मूळ उद्देश बाजूला राहत असल्याने गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करून या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी.
- डॉ. विजय बागुल, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक महासंघ
सध्या शाळांमध्ये खिचडी शिजविणे बंद असले तरी धान्य वाटप सुरूच आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवणे व इतर कामे ऑनलाईन शिक्षण देऊन सांभाळावे लागतात. शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे देऊ नये. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर होतो.
- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना