ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 - भाजपा सरकारच्या प्रचार, प्रसार तसेच केंद्रातील व राज्यातील सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीची मासिके जनतेत वितरीत न करता 3 टनांचे हे साहित्य चक्क रद्दी बाजारात विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेकडो योजनांची माहिती पुस्तके अवघ्या 30 हजारात विकली गेली आहेत.
केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेला व्हावी यासाठीचे प्रचार साहित्य गावागावात न पोहोचविता ते बरेच दिवस कार्यालयात व तेथून एमआयडीसीतील व्ही. सेक्टरमधील मे. राज इंडस्ट्रीज या रद्दी खरेदी करणा:या कंपनीत पोहोचले आहेत. यात काही प्रचार पत्रके तर नवी कोरी करकरीत माहिती पुस्तके आहेत.
कंपनीचे मालक राजेंद्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता चार-पाच दिवसांपूर्वी ही 3 टन रद्दी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी भाजपाचे कार्यालय मंत्री (ग्रामीण) अमित चौधरी यांना 10 हजार रुपये रोख व 20 हजाराची रकम ऑनलाईन पेमेंट सिस्टमद्वारे खाजगी अकाऊंटला जमा केल्याचे त्यांनी सांगितले.