जळगाव,दि.21- मराठा समाजाच्या आरक्षण या विषयावर राज्य शासन गंभीर असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
मराठा आरक्षण या विषयावर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे गोलमेज परिषद झाली. यावेळी मराठा समाज कृती समितीची भूमिका सकारात्मक होती. मराठा समाजाच्या आरक्षण या विषयावर मुख्यमंत्र्यांसह शासन गंभीर आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृती समितीला चर्चेसाठी बोलविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीपात्रातील वाळू उपसा हा केवळ जळगाव जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण राज्यातील गंभीर विषय झाला आहे. वाळू उपशासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासंदर्भात किंवा प्रचलित धोरणात काही बदल करता येतील का? यावर सरकार विचार करीत आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर नदीपात्रातील वाळू ठेका पद्धतीने न देता शासनाला स्वत: विक्री करता येईल का? या दृष्टीने शासन विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वाळू माफियांकडून तहसीलदार व महसूल कर्मचा:यांवर होणारे हल्ले लक्षात घेता त्यांना सुरक्षा पुरविण्याबाबत धोरण आखण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.