जळगाव : पाडळसरे (ता. अमळनेर) येथील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडले आहे. विप्रो कंपनीचे अध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्व अजिम प्रेमजी यांची अमळनेर ही कर्मभूमी असून, त्यांचे या कर्मभूमीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या धरणाच्या कामासाठी देणगी मिळविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जलनायक शिवाजी भोईटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
भोईटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अजिम प्रेमजी यांची अमळनेर ही कर्मभूमी आहे. त्यांचे शिक्षण अमळनेरला झाले असून, तेथेच त्यांनी वनस्पती तुपाचा कारखाना ५० वर्षांपासून सुरू केलेला असून, त्याचे एक युनिट अजूनही सुरू ठेवले आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी अमळनेर येथील कारखान्याला भेट दिली होती. अजिम प्रेमजी हे सलग तिसऱ्यावर्षी देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. शासनाने त्यांना पाडळसरे धरणासाठी मदतीचा प्रस्ताव देऊन ७८० कोटींची देणगी मिळवावी व धरणाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी भोईटे यांनी केली आहे. हे धरण पूर्ण झाल्यास या दुष्काळी परिसरातील २० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल. त्यामुळे शासनाने यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
------------
जिल्ह्यात दोन उदाहरणे
यापूर्वी जिल्ह्यात गिरणा नदीवर जळगाव मर्चंट बॅंक यांच्या देणगीतून म्हसावद (ता. जळगाव) येथे ३ दशलक्ष घनमीटरचा हरनारायण राठी बंधारा बांधण्यात आला आहे. तर नागझरी (ता. जळगाव) येथे इरिगेशन कंपनीतर्फे गिरणा नदीवर २ दशलक्ष घनमीटरचा कांताई बंधारा बांधण्यात आला आहे.