जळगाव: सरकारी जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करून ती एनए करून प्लॉट पाडून विक्रीत असल्याच्या व राष्ट्रीय महामार्ग क्र.६ साठी संपादन झाल्याने त्याची नुकसान भरपाई देखील मंजूर झाली आहे. हे जमिनीचे हस्तांतरण रद्द करावे व नुकसान भरपाईही रद्द करण्याबाबतची तक्रार चिखली ता.मुक्ताईनगर येथील विजयकुमार काकडे यांनी केली होती. त्याची दखल घेत चौकशी करून ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना ३ डिसेंबर रोजी दिले आहेत.
मौजे चिखली ता.मुक्ताईनगर येथील सर्व्हे नं. ५०/१ ब, गट न.६, गट नं.१६६, सर्व्हे नं. ४९/१ अ, ४९/१ ब, ४९/३, ५०/१ अ, ५०/२अ, ५०/२ ब व मौजे घोडसगाव येथील गट नं. ११२, ११२/१/१/१९ चे सरकारी जमिनीचे बेकायदेशिर हस्तांतरण व मूृल्यांकन नुकसान भरपाई रद्द करण्याबाबत काकडे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यात चिखली येथील तत्कालीन सरपंच आशा कांडेलकर व त्यांचे पती राजेंद्र प्रभाकर कांडेलकर यांनी गट नं.६ ही जमीन सरकारी गावठाणची असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने अकृषक केली. त्याचे प्लॉट पाडून विक्री होत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.६ साठीही काही जमीन अधिग्रहीत झाल्याने त्याचाही मोबदला मंजूर झाला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधीत दोषी अधिकारी व जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच जागेसाठीची नुकसान भरपाईही रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनीच हातमिळवणी करून बेकायदेशीरपणे ही जमीन अकृषक केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून पुराव्यासह वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.