आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा रेल्वे उड्डाणपुलांना शासन ५० टक्के निधी देईल. दोन वर्षात शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्त होईल, तसेच औरंगाबाद-जळगाव मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने अजिंठा चौफुलीपासून सुरू केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकात पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मांडताना माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे नकाशेदेखील रेल्वेकडून तयार आहेत. मात्र ५० टक्के खर्च रेल्वे तर ५० टक्के खर्च राज्य शासन करणार असे ठरले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबत मंजुरी नसल्याने या पुलाचे काम प्रलंबित आहे. हा पूल ११३ वर्ष इतका जीर्ण झाला आहे. त्यामुळे तातडीने याचे काम होणे आवश्यक आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर सोनवणे यांनी शिवाजीनगर पुलाचा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याऐवजी नगरविकास खाते त्यासाठी निधी देईल, असे सांगितले. तर लढ्ढा यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी ‘तो कशासाठी वर्ग केला ते माहीत आहे,’ असा टोला लगावला. मात्र रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणे महत्त्वाचे आहे, मनपा उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे निधी नगरविकास देईल की सार्वजनिक बांधकाम विभाग, कोणत्या हेडखाली टाकायचा? ते मी बघतो, असे सांगितले.अजिंठा चौफुलीवर दररोज अपघात, उपाययोजना कधी करणार?नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव-औरंगाबाद हा राष्टÑीय महामार्ग घोषित झाला असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नेरीजवळ काम सुरू आहे. जर चौपदरीकरणाचे काम अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीपर्यंत तातडीने सुरू केले तर वाहतुकीची कोंडी दूर होऊन अपघातांना आळा बसू शकेल, असा मुद्दा मांडला. आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही अजिंठा चौफुलीवर दर आठवड्याला एक बळी जात असल्याचे सांगत आजही एक बळी गेला असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी १६० किमी लांबीचे चौपदरीकरण होत असून जिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण होत आहे. सुरुवातीचे ६ किमी चौपदरीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की, या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. ते काम पहिले अजिंठा चौफुलीपासून व्हावे, म्हणजे समस्या तातडीने मिटेल, असे म्हणणे आहे. बैठक संपल्यावर औरंगाबादचे मुख्य अभियंता जोशी यांच्याशी बोलणे करून द्या, त्यांना याबाबत सूचना देतो, असे सांगितले.
जळगावातील शिवाजीनगर, पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी शासन ५० टक्के निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:19 AM
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आश्वासन
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिवाजी नगर पुलांच्या कामाला मंजुरी नसल्याने काम प्रलंबित आहेदोन वर्षात जळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्तजिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण