लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत खांब काढण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. विद्युत खांब काढण्याचे काम जोपर्यंत लांबत जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील लांबणार आहे. त्यामुळे सरकारी काम.. पण आता अजून किती दिवस थांब असे म्हणायची वेळ आली आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झाले आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामासाठी या पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब काढणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून निधी नसल्याने हे काम करण्यात न आल्याने हे काम रखडत जात आहे. महापालिका प्रशासनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधीमधून शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या निधीपैकी दीड कोटींच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत महापालिकेने ठरावदेखील झाला आहे. मात्र अद्यापही या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने हे काम रखडत जात आहे. या कामाला लागणारा निधीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले असून, यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा देखील समावेश आहे. या समितीने देखील या कामासाठी मंजुरी दिली असली तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून महापालिकेमार्फत हे काम केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
जितके काम रखडणार इतकेच पुलाचे काम थांबणार
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याआधीच विद्युत काम स्थलांतर करण्याच्या निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यात महावितरणनेदेखील आडमुठी भूमिका घेत निधी नसल्याचे कारण देत हे काम करण्याचे टाळले. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा निधी या विद्युत काम स्थलांतर करण्याबाबत मंजूर केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याने हा निधीचा वापर होऊ शकला नाही. आता महापालिकेने दीड कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी केली असतानादेखील, गेल्या चार महिन्यांपासून अद्यापही याबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. विद्युत खांब स्थलांतर करण्याचे काम जितके लांबेल तितकेच पुलाचे काम देखील लांबणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत खांब स्थलांतर करण्याच्या निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी आता शिवाजीनगर भागासह जळगाव तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.