जळगाव : शहरातील ६० वर्षाची परंपरा असलेल्या सुभाष चौकातील दहीहंडी फोडण्याचा मान यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण मित्र मंडळाचा गोविंदा गणेश जाधव याने मिळवला. या मंडळाने सहा थरांची सलामी दिली. त्यांना आयोजकांनी विजयी घोषित केले.
सुभाष चौक मित्र मंडळातर्फे गुरुवारी, या दहीहंडीचे आयोजन सुभाष चौकात करण्यात आले होते. चाळीस फुटांवर दहीहंडी बांधण्यात आली होती. पहिल्या प्रयत्नात श्रीकृष्ण मित्र मंडळाने सहा थर लावले. वीर बाजीप्रभू मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, गोपाळपुरा मित्र मंडळ व श्रीराम मित्र मंडळ यांनी सहापेक्षा अधिक थर लावून दहीहंडी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या मंडळांच्या नंतर आयोजकांनी श्रीकृष्ण मित्र मंडळाला आधीपेक्षा अधिक थर लावण्यासाठी आणखी एक संधी दिली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा सहा थर लावले. या दहीहंडीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे थर लागले. त्यामुळे या मंडळाला आयोजकांनी विजयी घोषित केले.
पारितोषिकाने गौरव
सुभाष चौक मित्र मंडळातर्फे विजयी मंडळाला ५१ हजार रुपये आणि आमदार सुरेश भोळे यांच्याकडून २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय सहभागी गोविंदा मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनाही आमदार सुरेश भोळे यांच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुनील खडके, सुभाष चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपाध्यक्ष मनिष अग्रवाल, सचिव प्रवीण बांगर, खजिनदार अलोक अग्रवाल, सदस्य हरिष चव्हाण, बापू कापडणे, आदित्य खटोड, गोपाळ पाटील, शैलेश घोलप, दीपक राजपूत, अक्षय खटोड, समर्थ खटोड, महेश गोला, विजय राजपूत, जय शर्मा, योगेश चौरसिया आदी उपस्थित होते.