चोपडा : गावठी दारू विक्रीची पोलिसांकडे तक्रार केल्याच्या संशयावरून घोडगाव येथील ग्रामपंचायत सदस्याच्या पती व मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घोडगाव ग्रामपंचायतीने मासिक सभेत दारूबंदीचा ठराव केला होता. यानंतर गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. याबद्दल दारू विक्रेते अरुण कोळी व दिलीप कोळी यांच्या मनात ग्रामपंचायत सदस्य मिनाजबी आसिफ मण्यार व त्यांचे पती आसिफ मण्यार यांच्यावर राग होता. त्यांना ते शिवीगाळ करीत होते.
शुक्रवारी सायंकाळी अरुण व दिलीप कोळी यांनी आसिफ शेख हकीम मण्यार व मुलगा आमीन यास मारहाण केली. मिनाजबी यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. आसिफ शेख यांच्या फिर्यादीवरून अरुण कोळी, मंगला कोळी, दीपक कोळी, दिलीप कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यात मंगलाबाई कोळी यांच्या फिर्यादीवरून आसिफ मण्यार, मीनाबाई मन्यार, किशोर दुसाने, अमित आसिफ मन्यार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे करीत आहेत.