आनंद सुरवाडे
जिल्ह्यातील ७८३ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना या निवडणुका आहे. ग्रामीण राजकारणावरच जिल्हा परिषदेच्या सदस्यांची अधिक धुरा असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील वेगळी गणिते मांडून अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवून जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकांमधूनच आगामी वर्षभराने होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची बांधणी करत आहेत. स्थानिक पातळीवरच अधिकाधिक वेळ देण्याचे नियोजन पदाधिकारी व सदस्यांनी केलेले आहे.
केंद्रात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे पक्षांना महत्त्व असते, तेवढे महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीत नसते, या ठिकाणी स्थानिक पॅनल, व्यक्ती, यांना महत्त्व दिले जाते. पक्ष या निवडणुकांमध्ये तसा गौण विषय त्यामुळे आपल्या निवडीच्या वेळी मतांमध्ये फूट नको म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्यही स्थानिक राजकारणानुसारच स्वत:ची भूमिका बदलतील, असे एकंदरीत वातावरण आहे. कारण वर्षभराने जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून, यात आपल्याला त्रास नको, अशी एक मानसिकता या निवडणुकीत सर्व सदस्यांची राहणार आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्हा परिषदेतील त्यांच्या समर्थकांची नेमकी भूमिका काय राहणार हेही या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. अखेर स्थानिक राजकारण वेगळे राहते, या नावाखालीही हे समर्थक भाजपला खो देत खडसे गटांसोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. एकनाथ खडसे यांची भूमिका, मात्र नेमकी अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर मोठा बदल दाखविण्यासाठी ही एक संधी असू शकते. या निवडणुकांवरच जिल्हा परिषदेची आगामी गणिते अवलंबून असल्याने सदस्यांनीही या निवडणुकांमध्ये गांभीर्याने लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. अनेक सदस्यांनी तर जिल्हा परिषदेतील फेऱ्या कमी केल्या आहेत. काहींनी कामे करून घेण्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत. काहींनी स्वत:च्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करण्यासाठी निधीही जाहीर केला आहे. कोरोनामुळे कामे ठप्प असल्याने दाखविण्यासारखे ठोस काही नसले तरी आगामी काळात आम्ही मोठा निधी देऊ, हा शब्द सदस्य देऊ शकणार आहेत. जर ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध झाले, तर आगामी जि. प. निवडणूक तेवढीच सुकर होणार असल्याने सदस्यांनी त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.