लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन न करण्यासह सवलतीचे गुण यावर्षी देऊ नयेत, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा रेखाकला परीक्षेच्या अतिरिक्त गुणांना कोरोनामुळे मुकावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया कला शिक्षकांनी दिली.
शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. कला क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ही परीक्षा पहिली पायरी असते. परीक्षेतून मिळणाऱ्या गुणांमुळे विद्यार्थ्यांची दहावीची टक्केवारी वाढते. या संकट कालावधीत या परीक्षांची विद्यार्थ्यांसाठी गरज वाढलेली आहे. हजारो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. एलिमेंटरी व इंटरमिजिएट पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळत असतात. मागील वर्षी या परीक्षेमुळे मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला. पण, आता परीक्षाच नाही तर नुकसान होणार आहे. आधीच कोरोनामुळे बहुतांश मुलांना शिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे ही परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
==================
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांचा फायदा होत असतो. मात्र, यावर्षी सवलतीचे गुण मिळणार की नाहीत, यावरच प्रश्न उपस्थित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रेखाकला परीक्षा होणार नसल्यामुळे (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा दिली असेल, त्याला त्या आधारावर गुण द्यावे.
-सुनील दाभाडे, कला शिक्षक
=====================
विद्यार्थ्यांवर शासनाने अन्याय केलेला आहे. कोरोनाच्या महामारीत वाढीव गुण मिळतात म्हणून कलाशिक्षकांनी घेतलेले कष्ट वाया गेले. जेईई, सीईटीसारख्या तत्सम परीक्षा घेतल्या गेल्या. किमान जे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि त्यांचे प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रातून आपापल्या बोर्डाकडे विहीत वेळेत पाठवले गेले. त्यांचे गुण तरी या वर्षांच्या एस. एस. सी. गुणपत्रकात देण्यात यावेत, असा आग्रह आहे.
राजेंद्र महाजन, ललित कला केंद्र, चोपडा
======================
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जो तुघलकी निर्णय घेतलेला आहे. तो विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत, या निर्णयाने महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. ही खेदजनक बाब महाराष्ट्रातील एका कलावंत प्रेमी मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत व्हावी, हे फार चिंताजनक आहे. चोपडा तालुका कलाध्यापक संघाच्यावतीने शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची आम्ही होळी करून आक्षेप नोंदवत आहोत.
- सुनील पाटील, अध्यक्ष, कलाध्यापक संघ
======================
कला क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण, तीच परीक्षा घेतली गेली नाही तर कलाप्रेमी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. इतर परीक्षा होतात. मग ही परीक्षा का होत नाही. त्यामुळे शासनाने याचा विचार करून परीक्षा घ्यावी.
- दीपक पाटील, विद्यार्थी