कूपन वाटप
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व नागरिकांचे हाल पाहता ते टाळण्यासाठी रोटरी भवन येथे नागरिकांना कूपन वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांना अधिक वेळ थांबावे लागणार नसून त्यांचा त्रास वाचण्यासह गर्दीही टाळता येणार असल्याचे सांगण्यात आले.
विजेचा लपंडाव
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून वाघ नगर, जिजाऊ नगर, रुक्मिणी नगर या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी देखील सकाळपासून वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. त्यात दुपारी जोरदार वारा व पाऊस यामुळे एक ते दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले.
अपघाताचा धोका
जळगाव : पिंप्राळा रिक्षा स्टॉपकडून बाजाररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. दगड-खडींचा वापर करून खड्डा बुजविण्यात आला आहे. यात दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
संध्याकाळी वाढली गर्दी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधा दरम्यान बाहेर फिरण्यास मनाई असली तरी अनेक जण अजूनही विनाकारण बाहेर फिरत आहेत. यामध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस झाल्यानंतर रामानंद नगर परिसर, काव्यरत्नावली चौक परिसर यासह शहरातील विविध भागात तरुणांनी एकत्र येत गर्दी केली होती.