जळगाव : भाऊकीचे वर्चस्व सिध्द करणारी जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवार, २३ रोजीपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवसाआधी इच्छुक उमेदवारांसह नातेवाईकांनी तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसाठी गर्दी केली होती.
जिल्ह्यातील ७८३ तर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जोवारीला मतदान होणार आहे. नंतर १८ जानेवारीला मतमोजणी होईल. दरम्यान, बुधवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. यासाठी तहसिलदारांकडून निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे़ मंगळवारी तालुक्यातील ४३ निवडणूक निर्णय अधिका-यांचा प्रशिक्षण वर्ग तहसीलदार नामदेव पाटील यांच्या उपस्थित पार पडला़ यात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. याप्रसंगी बीडीओ शशिकांत सोनवणे, निवासी नायब तहसीदार दिलीप बारी आदी उपस्थित होते.
तहसील आवारात केली टेबलांची मांडणी
बुधवारी निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल़ या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी तहसिल आवारात टेबलांची मांडणी करून १४ बॉक्स तयार केले आहे. प्रत्येक टेबलावर दोन निवडणूक निर्णय अधिकारी असतील. ग्रामपंचायतीनिहाय अर्ज स्वीकारले जातील. तसेच बुधवारी नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करण्याची प्रक्रिया राबविली जाईल. सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होईल़ नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करण्यासाठी २३ ते ३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्ज तपासणी कक्ष, डिपॉझिट कक्षासह इतर कक्षांची उभारणी केली जात आहे.
वेंडरांना तात्पुरते केले दुस-या जागी स्थलांतरीत
बुधवारपासून तहसील कार्यालय आवारात इच्छुकांसह त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी होईल. या पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसिल कार्यालयात शंभर मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावून दुचाकी वाहनांसाठी तो रस्ता बंद करण्यात आला. नंतर वेंडरांना सुध्दा तात्पुरते दुस-या जागी स्थलांतर करण्यात आले.
इच्छुकांसह नातेवाईकांची गर्दी
निवडणूक प्रक्रियेच्या एक दिवसाआधी मंगळवारी इच्छुक उमेदवारांसह नातेवाईकांची तहसिल कार्यालयात गर्दी बघायला मिळाली. अर्जासोबत लागलेल्या कागदपत्रांची विचारपूस करताना उमेदवार दिसून आले. तर काही कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्याच्या धावपळीत असल्याचे पहायला मिळाले. तहसिल आवारात बॅरिकेट्स लावल्यामुळे जिल्हा परिषद व बळीराम पेठकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी वाहने उभी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.
या आहेत ग्रामपंचायती
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उत्साह संचारला आहे. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून त्यामध्ये नशिराबाद, शिरसोली, प्रबो, शिरसोली प्र.न., मन्यारखेडे, ममुराबाद, रायपूर, कंडारी, तरसोद, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रूक, कडगाव, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, रिधूर, वावडदे, जवखेडे, भोकर, कठोरा, आवार, आव्हाणे, जळगाव खुर्द, असोदा, फुपनगरी, रामदेववाडी, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम
२३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करण्याची प्रक्रिया होईल. नंतर ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ४ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द होईल. १५ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन पत्रासोबत लागणारी कागदपत्र
- उमेदवारांच्या ऑनलाईन भरलेलया अर्जाची प्रत व आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरी.
- ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत ज्या पानावर उमेदवारांचे नाव आहे, त्याची प्रत.
- अनामत रक्कम पावती.
- राष्ट्रीयकृत बॅकेतील खात्याची पासबुकची छायांकित प्रत.
- मत्ता व दायित्व घोषणापत्र.
- हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र.
-गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र.
- राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांची जात वैद्यता प्रमाणपत्र/ प्रत नससल्यास जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोच.
-पोच सोबत विजयी झाल्यानंतर बारा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र.
-दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.
- २१ वयवर्ष पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा.
- आधारकार्डची छायांकित प्रत.
-ग्रामसेवकाकडून ग्रामपंचायत थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसभेतील मंजूर ठरावाची प्रत आदी घेवून ते अर्जासोबात जोडावे लागणार आहे.