संजय पाटील, अमळनेर (जि.जळगाव): अमळगाव ता. अमळनेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ईव्हीएम बंद पडल्याने मतदानासाठी तब्बल दीड तास खोळंबा झाला. कंटाळून काही शेतमजूर मतदान न करता कामाला निघून गेले. रविवारी सकाळी हा प्रकार घडला.
अमळगाव येथे सरपंच पदासाठी सात तर प्रभाग १ साठी एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी दोन ईव्हीएम युनिट वापरण्यात आले आहेत. सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा एकच मतदान होत होते. दुसरे मतदान होत नसल्याने मतदारांसह कर्मचारी व अधिकारी गोंधळात पडले. कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतरही मशिन सुरू होत नव्हते. निवडणूक अधिकारी मनोज सोनार यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याशी चर्चा केली. शेवटी मतदान यंत्र अमळनेरला पाठवण्यात आले.
नवीन यंत्र आणण्यात आले. दरम्यानच्या काळात शेतात जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी आलेले महिला, मजूर ,शेतकरी वाट पाहून कंटाळले होते. आपली मजुरी बुडू नये म्हणून ते मतदान सोडून शेताकडे निघाले. तब्बल दीड तासानंतर ९ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली. वायर खराब झाल्याने यंत्रणेत बिघाड झाला असल्याचे निवडणूक अधिकारी मनोज सोनार यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.