लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात कोरोनाची रुग्णवाढ समोर येत असताना जळगावात कोरोना वाढीमागे ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत असल्याचे मत काही तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या ठिकाणी कुठल्याच नियमांचे पालन न करता मोठी गर्दी झाली आणि कोरोना वाढल्याचे सांगितले जात आहे. रोज येणाऱ्या आकडेवारीवरूनही ते समोर येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना फेब्रुवारीतच त्याच्यात वाढ होण्याची काही विशिष्ट कारणे समोर येत आहेत. यात ग्रामपंचायत निवडणूक, निकालाला झालेली अनियंत्रित गर्दी, एकमेकांचा वाढलेला संपर्क, शहरी भागातून ग्रामीण भागात मतदानासाठी गेलेले नागरिक, अशी अनेक कारणे कोरोनावाढीला कारणीभूत असू शकतात, असे काही डॉक्टरांचे मत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेत नियम पाळून जर मेळावे झाले असते तर रुग्णसंख्या आटोक्यात असती, असाही एक तर्क लढविला जात आहे. राष्ट्रवादीचे एकएक पदाधिकारी कोरोनाबाधित आढळून येत असल्याने हे मेळावेच रुग्णवाढीला कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.
कोट
गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी नियम न पाळणे हे कोरोनावाढीचे मोठे कारण ठरू शकते, आता जी रुग्णवाढ समोर येत आहे, त्याचे विश्लेषण केले असता, जिल्ह्यात गर्दीला कारणीभूत काय काय घटना घडल्या ते शोधणे महत्त्वाचे आहे. मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न पाळणे ही कोरोना वाढीला निमंत्रित करणारी कारणे आहेत. - डॉ. भाऊराव नाखले, मेडिसीन विभागप्रमुख जीएमसी
ग्रामीण भागात शिरकाव
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाने धडक दिली आहे. यात शिरसोली येथे दोन दिवसात ७ बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नसमारंभातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या ठिकाणी उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी नीलेश अग्रवाल यांनी केले आहे.
शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी तेजस्विनी देशमुख, आरोग्य सेवक अनिल महाजन व नीलेश चौधरी यांनी दोन दिवसात नागरिकांच्या तपासण्या केल्या आहेत.