नशिराबाद : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे मंगळवारपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बुधवारी मागे घेण्यात आला. ८ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार देणार व १५ एप्रिलपर्यंत सर्व थकीत पगार देण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. दरम्यान, थकीत वेतन १५ एप्रिलपर्यंत पूर्ण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या सात ते आठ महिन्यांचा पगार थकल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी एका कर्मचाऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतर बुधवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, ग्राम विकास अधिकारी बी. एस. पाटील यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत थकीत वेतनाबाबत तोडगा काढला. कर्मचाऱ्यांनी त्याला सकारात्मकता दर्शविली.
गावात वसुलीचे प्रमाण वाढवून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार देण्यात येणार आहे. त्यातच नियमित जे पगार होतील त्यांच्या पगारात कपात केलेली प्राव्हिडंट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या फंडाच्या खात्यात जमा करण्यात येईल व १५ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले. याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, सय्यद नजीर अली, सय्यद फिरदोस, ललित बऱ्हाटे, विनोद चिरावंडे, विकास वाघुळदे, संतोष रगडे, पराग बराटे, गिरीश रोटे, अशोक कावळे यांच्यासह कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या व थकीत वेतन १५ एप्रिलपर्यंत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी दिला.