सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. यामुळे पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा शासन निर्णय बदलून आता शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची घंटा आता ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे.
यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांविना सुरू आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाने आता आदेश काढले आहेत. यातही ग्रामपंचायतींचा ठराव तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासंदर्भात पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेतील, त्याच गावात आता शाळा सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांबाबत अद्यापतरी कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागणार आहे.
००००००००००
जिल्ह्यातील एकूण शाळा - ३,३९९
शासकीय शाळा - ३१
अनुदानित शाळा -९६२
विनाअनुदानित शाळा - १५६
जिल्ह्यातील एकूण गावे - १,४९९
जिल्ह्याती कोरोनामुक्त गावे - १,१७९
००००००००००
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
अमळनेर - १४२
भडगावा - ४६
भुसावळ - ५०
बोदवड- २२
चाळीसगाव - ९८
चोपडा- ९२
धरणगाव - ८६
एरंडोल - ४२
जळगाव - ७४
जामनेर - ११९
मुक्ताईनगर - ६१
पाचोरा - ९०
पारोळा - ९५
रावेर - १०१
यावल - ६१
००००००००००
ग्रामपंचायतींना पाठविले पत्र
शासन आदेशानंतर शिक्षण विभागाने शाळांमार्फत ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनामुक्त शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेण्याचे कळविले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव झाल्यानंतर त्या गावात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीने असा ठराव घेतला नसला तरी काही गावांत अशा प्रकारची तयारी सुरू करण्यात आली आहे.
००००००००००
शासनाचे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय हा ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे. नुकतेच ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. किती शाळांनी ठराव केले, हे सोमवारी शिक्षण विभागाला प्राप्त ठरावानुसार कळेल.
- बी. जे. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी
००००००००००
शाळाही तयार...
जिल्ह्यातील सर्वच गावातील शाळा सज्ज आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मुलेसुध्दा घरात अडकली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक चिंतेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. तसेच पालकसुध्दा पाल्यास पाठविण्यास तयार आहेत.
००००००००००
पालकांची होकार
कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. त्यामुळे मागील सत्रापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावात शाळा सुरू करण्यास काहीही हरकत नाही. पाल्यास पाठविण्यास आमची संमती आहे. शाळा, महाविद्यालयांनीसुध्दा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी.
-विद्या खरात, पालक
०००००
कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गावातील शाळा तसेच शहरातील काही वर्ग सोशल डिस्टन्सचे नियम पाळून सुरू करण्यास काहीच हरकत नाही. यामुळे शाळा सुरू करणेच योग्य ठरेल.
- भूषण महाजन, पालक