ऑनलाईन लोकमतअमळनेर,दि.20 : स्वच्छता, आरोग्य, पाणी ,दिवे यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामसेवक आणि सरपंच अकार्यक्षम ठरल्याचा निषेध म्हणून आजी माजी ग्रा.पं.सदस्यांनी पिंपळी ग्रामपंचायतीचा दशक्रिया व उत्तरकार्य विधी करण्यासाठीचा अजब शोक संदेश पत्रिका तयार केली आहे.11 ऑगस्ट 2015 पासून पिंपळी येथे पाणी, आरोग्य, स्वच्छता, पथदिवे पुरविण्यास सरपंच, ग्रामसेवक अकार्यक्षम ठरले आहेत. वारंवार मागणी करूनही उपयोग होत नाही. ग्रामपंचायत कार्यालय जणू काही देवाज्ञा झाले म्हणून 2 ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी कार्यालयाचे गंधमुक्ती, उत्तरकार्य व पिंड दान कार्यक्रम सकाळी 11 वा पिंपळी येथे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते आयोजित केल्याची निषेधात्मक शोक संदेश पत्रिका तयार केली आहे. पत्रिकेत शोकाकुल म्हणून ग्रा पं चे माजी सदस्य मनोज महाजन, ग्रापं सदस्य मनीषा महाजन, वैशाली महाजन, गुलाब महाजन, विकासो सदस्य रवींद्र महाजन यांची नावे आहेत. पिंपळी हे गाव प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांची जन्मभूमी असलेले आदर्श गाव आहे. या अभिनव निषेध पत्रिकेची मात्र सर्वत्र चर्चा आहे.
2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा होणार आहे. ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने ग्रा.पं.चे विधिवत उत्तरकार्य करून गावाला भोजनही देण्यात येणार आहे. -मनोज महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य, पिंपळी, ता.अमळनेर
दोन महिन्यांपासून पदभार घेतला आहे. दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. पथदिवे लावणे सुरु आहे. गेल्यावेळी झालेल्या धुरळणीचे पैसे दिलेले नव्हते. ते देऊन दोन दिवसात धुरळणी करण्यात येईल.-नितीन पाटील, ग्रामसेवक, पिंपळी.