न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : मांस विक्रेत्यांना कुंभार वाड्याबाहेर हलविणे, गॅस सिलिंडर घरपोच आदी विषयांवरून येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध विषयांनी गाजली.ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. सकाळी नऊ वाजता महिला ग्रामसभा घेऊन त्यात महिला बचत गटाचा आढावा व महिला सक्षमीकरण याबाबत बालविवाह प्रतिबंधक जलशक्ती अभियान राबवण्यात आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.महिला ग्रामसभा आटोपल्यानंतर पुरुषांची ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसमोर आपल्या समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मागणी केली. त्यात प्रामुख्याने गावात येत असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणे, अखिल भारतीय प्रजापती कुंभार समाजाच्या वतीने कुंभार वाड्यात सुरू असलेले मांसविक्री मटण दुकान वाड्याच्या बाहेर हलवण्याबाबत तसेच गावात एकमेव राष्ट्रीयकृत असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रमधील व्यावहारिक समस्या, होणारी गर्दी यावर योग्य तो तोडगा काढणे आदी विषयावर लेखी अर्जाद्वारे ग्रामस्थांनी आपल्या समस्या ग्रामपंचायत सदस्यांसमोर मांडल्या व त्या सोडवण्याची मागणी केली.सभेत जलशक्ती अभियान केंद्र पुरस्कृत बेटी बचाव बेटी पढाव चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत जमाखर्च करणे, सर्वांसाठी घरे, १ जानेवारी २०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करणे, प्रधानमंत्री शबरी रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर जागा उपलब्ध करणे, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत समाविष्ट टाकीची दुरुस्ती आदी शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात दिलेल्या अर्जाबाबत चर्चा करण्यात आली.वाचन ग्रामविकास अधिकारी एस.आर. देसले यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच भारती नितीन चौधरी होत्या. उपसरपंच सतीश जंगले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्हावी येथील ग्रामसभा गाजली विविध विषयांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 3:47 PM