अमित महाबळ, जळगाव: अंगणवाड्यांच्या वीज बिलांसाठी शासनाने बजेटमध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावातील शाळा, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील याकडे ग्रामसेवकांनी लक्ष दिले पाहिजे. गावातून करवसुली झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर विसंबून राहू नका, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागातर्फे शनिवारी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला.
गिरीश महाजन पुढे म्हणाले, की केंद्राकडून कोट्यवधी रुपये योजनांसाठी उपलब्ध होत आहेत. खर्च झाले नाहीत तर आम्हालाही विचारणा होते. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे ही केंद्राची भूमिका आहे. वाडी, वस्ती व दुर्गम भागात सुविधा मिळायला हव्यात. गावाच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. पुण्य केलेले लोकच ग्रामसेवक, तलाठी होतात!
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, पण ग्रामसेवकाशिवाय गावाचा उद्धार शक्य नाही. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी यांची क्रेझ असते, आमचे उतारे त्यांच्या कपाटात असतात. मागील काळात काहीतरी पुण्य केलेले लोकच ग्रामसेवक आणि तलाठी होतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
.. तर आम्हाला घरी जावे लागेल!
आम्हाला कधीच असे पुरस्कार मिळाले नाहीत. ग्रामसेवक वयाच्या ५८ पर्यंत काम करतो. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी साठीपर्यंत राहतील. आम्हाला मात्र पाच वर्षेच आहेत. आता सव्वा वर्ष राहिले आहे. यानंतर लोकांनी मतदान केले तर ठीक नाही, तर घरी जावे लागेल, असेही गुलाबराव पाटील मिश्कीलपणे म्हणाले.