कुंदन पाटीलजळगाव : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ‘रात्र वैऱ्याची’ मावळतीला गेली आहे. कारण बाहेरगावासह स्थानिक मतदारांना ‘ऑनलाईन बेणं’ देण्याचा प्रकार बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये सुरु आहे. सुरत, मुंबई, पुणेसह अन्य शहरात असलेल्या मतदारांच्या खात्यात सर्वाधिक पैसा धाडण्यात आल्याची माहिती उमेदवारांच्या गोटात गेल्यावर उजेडात आली आहे.
जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.४) मतदान होत आहे. त्यामुळे शनिवारची ‘रात्र वैऱ्याची’ ठरेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज साफ खोटा ठरला आहे. बहुतांशी उमेदवारांनी परगावात वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या बॅंक खात्यात प्रवास भाड्यासह मतदानापोटी ‘बेणं’ची रक्कम वर्ग केली आहे.त्यामुळे उमेदवारांना शनिवारची रात्र जागून काढण्याची गरज उरलेली नाही, असा दावा भडगाव तालुक्यातील एका उमेदवाराने केला.
गावकऱ्यांची ‘सोय’
शुक्रवारपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांच्या दिमतीला उमेदवारही सरसावले आहेत. काहींनी ‘कूपन’ हातात देत खाण्यापिण्याचीही वाट मोकळी करुन दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल्समध्ये रात्री उशीरापर्यंत ‘झिंगाट’ सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज मतदान
१६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी रविवारी ५६६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ७९ ग्रा.पं.तील१२५ जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. त्यासाठीही रविवारी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.
आठवडे बाजार रद्द
ग्रामपंचायतीची निवडणुक असल्यास रविवारी आठवडे बाजार भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. हा बाजार अन्य दिवशी भरविण्याचे आदेश दिले आहेत.
वार्षिक तपासणी स्थगीत
दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षकांसह त्यांच्या पथकाकडून जिल्ह्यातील पोलीस स्टेशनसह अन्य कार्यालयांची वार्षिक तपासणी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकींमुळे शनिवारपासून या तपासणीला स्थगीत करण्यात आले आहे. दि.८ नोव्हेंबरपासून तपासणी पूर्ववत होईल, असे सुत्रांनी सांगितले.