रावेर : लहानाची शहाणी होईपर्यंत आईची आई असलेल्या केर्हाळे खुर्द येथील वृध्द आजीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने नात आपल्या पतीसमवेत मामाकडे दोन दिवस मुक्कामी राहून आजीची अंतिम भेट घेऊन परत जात असताना, ट्रकने मोटारसायकलला धडक देत खाली पडलेल्या ३८ वर्षीय नातीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पतीही एका पायाचा ट्रकखाली चेंगरून चेंदामेंदा झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रावेर-बर्हाणपूर राज्य महामार्गावरील भोकरी फाट्यावर रविवारी दुपारी १ :५० वाजेच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील निंभोरासीम येथील माहेरवाशीण असलेल्या तथा मध्य प्रदेशातील मंगलाबाई सोपान शिरसाठ (वय ३८, रा. वख्खारी, ता.जि.बर्हाणपूर) या आपले पती सोपान कडू शिरसाठ यांच्यासमवेत तालुक्यातील केर्हाळे खुर्द येथील त्यांच्या मामाच्या घरी लहानपणी संगोपन केलेल्या व अंथरुणावर खिळून असलेल्या वृध्दा आजीच्या भेटीसाठी दोन दिवसांपासून मुक्कामी होत्या. दरम्यान, आज पतीसह मोटारसायकल (एमपी-१२-एमडी-९१५८) ने घरी जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा भोकरी फाट्यावर वळण घेण्याच्या बेतात असताना त्यांच्या मोटारसायकलला रावेरकडून बर्हाणपूरकडे भरधाव वेगात येणार्या ट्रक (एमपी-०७/एचबी- ३३७१) ने जबर धडक दिली. त्या भीषण अपघातात मोटारसायकलवर खाली पडलेल्या मंगलाबाई सोपान शिरसाठ (वय ३८) रा. वख्खारी, ता. जि. बर्हाणपूर यांचा भरधाव वेगातील ट्रकखाली चेंगरून जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती सोपान शिरसाठ यांच्या एका पायाचा चेंदामेंदा होवून गंभीर जखमी होऊन मोटारसायकलचे नुकसान झाले. ही दुर्घटना ३ जानेवारी रोजी दुपारी १:५० वाजेच्या सुमारास बर्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावरील भोकरी फाट्यावर घडली. गंभीर अत्यावस्थेतील जखमी सोपान कडू शिरसाठ यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता औषधोपचार करून जळगावला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी.महाजन यांनी मयत विवाहीतेचे शवविच्छेदन केले. मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी मयत विवाहीतेचा मामेभाऊ देवानंद नारायण तायडे रा.केर्हाळे खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात ट्रकचालक आरोपी रामप्रतापसिंग जगदीश यादव (रा.गोरमी गोरम, ता.मेहगाव, जि.भिंड, म.प्र.) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पो.नि.रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव, नीलेश चौधरी तपास करीत आहेत.
मोटारसायकलवर आजीच्या भेटीसाठी आलेली नात ट्रकखाली चिरडून जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 8:12 PM
मोटारसायकलवर आजीच्या भेटीसाठी आलेली नात ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाली.
ठळक मुद्देभोकरी फाट्यावरील घटना,पतीच्या पायाचा चेंदामेंदा होऊन गंभीर जखमीट्रकचालकाला अटक