जळगाव : तालुक्यातील वडली येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करीत २५ हजारांची रोख रक्कम लांबविली. एकाच घरात रक्कम हाती लागली, इतर ठिकाणी कापूस ठेवलेला आढळला तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत असताना आरडाओरड झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे गावातीलच एक दुचाकी चोरून त्यावरच फिरत वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करण्यात आली. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेपासून ते साडेतीन वाजेदरम्यान घडली. म्हसावद पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.
वडली येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य केले. माजी सरपंच नारायण पाटील यांचा मुलगा किरण पाटील यांच्या मालकीची दुचाकी त्यांच्या घरासमोर लावलेली होती. चोरट्यांनी सामनेर येथून चोरलेली दुचाकी पाटील यांच्या घरासमोर लावली व त्यांची दुचाकी घेऊन पसार झाले. ही दुचाकी घेऊन ते राजेंद्र एकनाथ पाटील यांच्या घराकडे वळले. हे घर दोन मजली असून कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले होते. चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप तोडून कपाटाचे लॉकर उघडले. त्यात चोरट्यांच्या हाती २५ हजार रुपये लागले, ते घेऊन ते पसार झाले.
तेथून चोरट्यांनी सुधाकर तानाजी पाटील यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी घरात केवळ कापूस ठेवलेला आढळला. त्याचवेळी घरासमोर एक महिला जागी झाली व तिने तिच्या पतीला जागे केले. त्यांनी मित्रांना फोन केला व काहीजण जागे झाले. त्यावेळी चोरटे पसार झाले. त्यानंतर त्यांनी भाऊसाहेब दयाराम देसले यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी आजूबाजूचे नागरिक जागे झाले व त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. या विषयी म्हसावद पोलिस चौकीमध्ये माहिती देण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.