लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना संसर्गाने निराधार, अपंग, अनाथ यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थानलाही याची झळ बसत आहे. वर्षभरापासून या सामाजिक संस्थांच्या आर्थिक मदतीसह येथील दैनंदिन उपक्रमांवरदेखील परिणाम झाला आहे. असे असले तरी या संस्था मनोरंजनात्मक उपक्रम राबवून बच्चे कंपनीसह आजी-आजोबांचे मन रमविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या संकटातही ऑनलाईन समुपदेशनाचा उपक्रम सुरूच असून, याद्वारे विविध संदेश दिले जात आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला आणि संपूर्ण जगात सर्व क्षेत्राला त्याने व्यापून टाकले. यामध्ये सर्व व्यवहार ठप्प होण्यासह रोजंदारीने काम करणाऱ्या मजूर, कामगारांचे तर मोठे हाल झाले. यामध्ये नंतर सर्व व्यवहार सुरळीत होत असताना त्याचा आधार होऊ लागला. मात्र, गेल्या वर्षभरापासून तर निराधार, अपंग, मतिमंद, गतिमंद यांचा सांभाळ करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या असून, अजूनही त्या यातून सावरलेल्या नाही.
निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना दाते आपापल्या परीने मदत करत असतात. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाने ही मदत कोठे थांबली, तर कोठे कमी झाली आहे. याशिवाय कोरोनाच्या संकटामुळे भेटीगाठी देखील होत नसल्याने या सर्व ठिकाणी असलेल्या मुले, वृद्ध यांचे मनोरंजन व्हावे यासाठी संस्थांनीच पुढाकार घेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत.
जळगावातील बालसुधार गृह, मातोश्री वृद्धाश्रम, आश्रय माझे घर या संस्थांचा आढावा घेतला असता तेथे या संस्था आपापल्यापरीने मदत करीत आहेत.
शाळेचा वेळ विविध खेळांमध्ये
बालसुधारगृहामध्ये ३४ मुली व २५ मुले आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने या मुलांच्या ११ ते ५ या शाळेच्या वेळेचा सदुपयोग व्हावा व मुलांचे मनोरंजनही व्हावे यासाठी या काळात त्यांच्यासाठी विविध बैठे खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम, गप्पागोष्टी, प्रोत्साहनपर मार्गदर्शन, असे उपक्रम राबवून त्यांचा दिनक्रम ठरविला आहे. यासोबतच आता प्रत्यक्ष समुपदेशन होत नसले तरी मुलांसाठी ऑनलाईन समुपदेशन केले जात आहे.
या ठिकाणी थेट तयार अन्न देता येत नसले तरी अनेक दाते कोरडे धान्य व इतर मदत करीत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. त्यामुळे दात्यांचा याठिकाणी मोठा आधार आहे.
मतिमंद, गतिमंद असलेल्या मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंतच शासनाकडून त्यांचा सांभाळ केला जातो. त्यानंतर मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. अशा मुलांचा जळगावातील आश्रम माझे घर ही संस्था सांभाळ करते. सध्या या संस्थेत असे २२ जण असून, गेल्या वर्षभरापासून मोठी आर्थिक अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे मातोश्री वृद्धाश्रमात देखील मदतीचा ओघ कमी झाल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मातोश्री वृद्धाश्रमात सध्या ३६ जण आहे. या दोन्ही ठिकाणी देखील मुलांसह आजी-आजोबांसाठी संस्था विविध उपक्रम राबवीत आहे.
------------------
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांच्या ११ ते ५ या शाळेच्या वेळेमध्ये बालसुधारगृहात बैठे खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम, विविध गोष्टींचे मार्गदर्शन असे उपक्रम राबविले जात आहेत. यातून मुलांचे समुपदेशन करण्याचा देखील प्रयत्न आहे.
- जयश्री पाटील, अधीक्षिका बालसुधार गृह.
कोरोनाचा संसर्ग उद्भवला तेव्हापासून संस्थांना मिळणारी आर्थिक मदत बंद झाली आहे. असे असले तरी येथील मुलांचे मन या ठिकाणी टिकून राहावे व कोरोना काळात त्यांनी कोठे जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी समुपदेशन व मार्गदर्शनपर उपक्रम राबविले जातात.
- रेखा पाटील, संचालिका, आश्रय माझे घर
संस्थांना मिळणारी मदत कमी झाली असून, अनेक उपक्रम राबविता येत नाहीत. तसेच साहित्य खरेदी करतानाही विचार करावा लागतो. कोरोना काळात वृद्धांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. त्यांच्यासाठी दैनंदिन ठरलेले उपक्रम कायम असून, ते वाचनामध्ये अधिक रमत आहेत.
- सागर येवले, मातोश्री वृद्धाश्रम