लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात आदिवासी बांधवांना मदत व्हावी म्हणून शासनाने जाहीर केलेल्या खावटी अनुदानासाठी लावण्यात आलेल्या निकषानुसार खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यास वेळ लागत असल्याने हे सर्वेक्षणही लांबत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात अद्याप या अनुदानाचे वाटप सुरू झालेले नाही.
कोरोना काळात व्यवहार ठप्प झाल्याने शेतीच्या कामांवरही त्याचा काहीसा परिणाम झाला. या काळात आदिवासी बांधवांना मदत म्हणून आदिवासी विभागातर्फे खावटी अनुदान जाहीर करण्यात आले. यात अगोदर दोन हजार रुपये व दोन हजार रुपयांचा किराणा माल असे देण्याचा निर्णय झाला. मात्र नंतर किराणा माल न देता थेट संपूर्ण चार हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला.
या अनुदानाच्या लाभासाठी संबंधित व्यक्ती हा भूमीहीन असावा, त्याचे उत्पन्न ठरवून दिले असून विधवा महिलांनाही याचा लाभ दिला जातो. सर्वेेक्षणकर्त्याला निकषात बसणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्यावा लागत असल्याने यात अधिक वेळ जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आदिवासी बांधव कामानिमित्त इतर ठिकाणी स्थलांतरितही होतात, त्यामुळे ते पुन्हा परत येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अद्याप हे सर्वेक्षण पूर्णत्वास आले नसल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले.
एकूण लाभार्थी किती, हे ठरल्यानंतरच प्रत्येकी चार हजार रुपये अनुदानानुसार जिल्ह्यासाठी लागणारा निधी स्पष्ट होणार आहे.