लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळ्यात अतिपावसाने खरीप पिकाचे नुकसान झाले. मात्र जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगाम चांगला येणार या आशेवर असताना शेतात गहू तरारलादेखील. मात्र आताही निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, अशी व्यथा चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील गहू उत्पादक शेतकरी नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात गुरुवार, १८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सात तालुक्यांमध्ये तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका बसला असून सर्वच ठिकाणी ३३ टक्केंच्यावर नुकसान झाले आहे. रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, चोपडा, एरंडोल, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये १४१ गावांमध्ये १३ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका
अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला आहे. तब्बल २००८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले. त्या खालोखाल मक्याचे ७१६ हेक्टर, ज्वारीचे ४०२ हेक्टर, हरभऱ्याचे २८४ हेक्टर, इतर पिके ४६ हेक्टर, बाजरीचे ३१ हेक्टर, कांद्याचे २५ हेक्टर तर केळीचे एक हेक्टर असे एकूण तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील गहू उत्पादक शेतकरी नरेंद्र जाधव यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. मात्र अतिपवासामुळे पाणीसाठ्यात चांगले पाणी असल्याने रब्बीसाठी त्यांनी चांगलीच मेहनत घेत गव्हाची लागवड केली. आता गहू तरारला असतानाच अवकाळी पावपाचा फटका बसला व पाच चे सहा हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले.
तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका झालेले नुकसान
रावेर ३२
मुक्ताईनगर ४७
भडगाव ६८
चोपडा १२६
एरंडोल ६५०
अमळनेर २५३०
पारोळा १४०
एकूण ३५९३
पिकांचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका गहू मका बाजरी ज्वारी कांदा हरभरा इतर केळी
रावेर २५ ६ — — — — — १
मुक्ताईनगर ४७ — — — — — — —
भडगाव ५० — २ १६ — — — —
चोपडा ५६ ३ — ६७ — — — —
एरंडोल ३३० १६५ १५ ११५ २५ — — —
अमळनेर १४४४ ५८६ — १८० — २८० ४० —
पारोळा ५६ ३६ १४ २४ — ४ ६ —
एकूण २००८ ७१६ ३१ ४०२ २५ २८४ ४६ १