जळगाव : आयोध्या नगरातील सद्गुरू नगर येथील देशमुख डेअरी मागील खुल्या भूखंडावरील गवताने शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली. दरम्यान, धुडकू सपकाळे यांनी अग्निशमन दलास याबाबत तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविले.
सद्गुरू नगरातील खुल्या भूखंडामधील गवताला शुक्रवारी अचानक आग लागली. या भुखंडाजवळ तीन ते चार वाहने उभी होती. आग लागल्याची घटना परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी वाहने बाजूला गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, कुणीतरी कचरा पेटविल्यामुळे ती आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त केला. अग्निशमन दलाच्या पथकात वाहनचालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील,वसंत कोळी, नितीन बारी यांचा समावेश होता.