ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये रिक्त असलेल्या दोन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार येत्या ८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून, दुसऱ्यादिवशी९ तारखेला जळगाव येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.ग्रामपंचायतीच्या सभांना सतत गैरहजर असल्याचा ठपका ठेवून लक्ष्मी चौधरी यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ४० (ब) नुसार अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी तत्कालिन प्रभारी सरपंच मालुबाई पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे ५ जून २०१८ रोजी केली होती. त्यानुसार जळगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर तक्रारदारांच्या म्हणण्यात तथ्य आढळून आले. तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर झाल्यानंतर प्रतिवादी लक्ष्मी चौधरी यांनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. शेवटी जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर झालेल्या अंतिम सुनावणीत उपलब्ध दस्तावेजानुसार लक्ष्मी चौधरी यांना अपात्र ठरविण्याचा आदेश काढण्यात आला. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमितेला जबाबदार धरून लक्ष्मी चौधरी यांना नाशिक विभागीय आयुक्तांनी यापूर्वीच सरपंच पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व सुद्धा गेले.आता उशिरा का होईना वॉर्ड पाचमधील अनु. जमाती महिला राखीव जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्या जागेवर निवडून येणारी महिला थेट सरपंच होणार असल्याने अर्थातच राजकीय मंडळींचे लक्ष तिकडे वेधले गेले आहे. याशिवाय वॉर्ड पाचमधील ग्रामपंचायत सदस्य महेश चौधरी यांनीही वैयक्तिक कारणातून राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठीही ८ डिसेंबरलाच मतदान घेण्यात येणार आहे.राखीव जागेचा सदस्यच नसल्याने पेचमहसूल विभागाने सरपंच पदासाठी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. अपेक्षेनुसार सरपंचपद हे अनुसुचित जमाती महिला संवर्गासाठी राखीव असले तरी त्या जागेचा एकही सदस्य ग्रामपंचायतीत अस्तित्वात नसल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. या सर्व घडामोडीत ग्रामपंचायतीचा कारभार प्रभारी सरपंचांकडूनच चालविला जात होता.असा आहे निवडणूक कार्यक्रम१६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक झाल्यास ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, तर ९ तारखेला जळगाव येथे तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. पिंप्राळा भागाचे मंडळ अधिकारी रवींद्र उगले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तसेच ममुराबादचे तलाठी एस. एस. पाटील आणि ग्रामविकास अधिकाºयांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरपंचपदाच्या आरक्षित जागेसाठी मोठीच चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:05 PM