लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एरंडोल येथे पाच दिवशीय जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.
जनता कर्फ्यू च्या पहिल्या दिवशी गुरुवारी मेन रोड, फुले-आंबेडकर व्यापारी संकुल, बस स्थानक परिसर, म्हसावद नाका परिसर, बुधवार दरवाजा परिसर, भाजीपाला बाजार,मुख्य बाजारपेठ, दुकाने सर्वत्र बंद होती शहरात रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. व्यावसायिक व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती.
एरंडोल शहर व परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक वाढ होत. असल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे .या पार्श्वभूमीवर सदरचा जनता कर्फ्यू नागरिकांनी यशस्वी करावा यासाठी नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान जनता कर्फ्यू च्या दिवशी लॉक डाऊन च्या नियमांचा भंग केला म्हणून काही दुचाकी स्वरांवर कायदेशीर कारवाई करत होते. तसेच मास्क न लावलेले व विनाकारण फिरणाऱ्यांव पोलीस, होमगार्ड,नगरपालिकेचे कर्मचारी शहरात ठीक ठिकाणी बंदोबस्त करीत होते.
नगरपालिकेतर्फे लाऊड स्पीकर वरून जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. दरम्यान दवाखाने, मेडिकल ही आस्थापने सुरू होते. दूध डेअरी यांना मात्र सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास वेळ देण्यात आला आहे. जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलीस पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी परिश्रम घेतले.